भीषण वास्तव : केवळ ४ महिन्यांत राज्यात २०३ महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या

15 Mar 2016 , 09:33:46 PM

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरणाच्या गोष्टी करत असताना भाजप- सेना सरकारच्या काळात महिला शेतकऱ्यांच्याही आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात २०३ महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा खुलासा झाला आहेत. ही धक्कादायक माहिती खुद्द कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तर देताना दिली आहे. राज्यातील हे भीषण वास्तव या पार्श्वभूमीवर उघड झाले असतानाच सरकारची या गंभीर प्रश्नाबाबतची उदासिनताही प्रकर्षाने समोर आली आहे. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना योग्य आर्थिक मदत देण्याबाबत विधानपरिषदेच्या ४५ सदस्यांनी मिळून प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उपप्रश्नात अमरावती, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सांगली, चंद्रपूर आणि मराठवाडा विभागात किती शेतकऱ्यांनी आणि महिला शेतकऱ्यांनी १ ऑक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान आत्महत्या केल्या आहेत याची विचारणा झाली होती. अमरावती विभागातील १५३६ आत्महत्यापैकी १२४ महिला शेतकरी आहेत, औरंगाबाद विभागात १४५४ आत्महत्यापैकी ६७ महिला आहेत तर नाशिक विभागात ६६१ आत्महत्यांपैकी १२ महिला आत्महत्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी लेखी उत्तरात दिली. म्हणजेच केवळ चार महिन्यात तब्बल २०३ महिलांनी शेतीला कंटाळून आत्महत्या केल्याचे कृषीमंत्र्यांच्या उत्तरातून दिसून येते. हे अत्यंत विदारक वास्तव आहे. 
राज्यातील महिला दुष्काळी परिस्थतीशी झुंजून आत्महत्येचा पर्याय स्वीकारत असताना सरकार मात्र याबाबत निष्क्रिय आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी सातत्याने आवाज उठवत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीने अधिवेशनात सरकारला धारेवर धरले आहे, पण शेतकरी महिलांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे तरी सरकारला अखेर जाग येणार का आणि कर्जमाफी होणार का हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

शेतकरी महिला आत्महत्या करत नाहीत, असा आजवर वाटत होतं. पण सरकारने ऑक्टोबर २०१५ ते जनेवारी २०१६ या चार महिन्यांतली सादर केलेली आकडेवारी धक्कादायक आहे. पुरूष शेतकरी आत्महत्या केल्यानंतर महिलाच कुटुंबाचा भार वाहते. शेती करण्यापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत सर्व जबाबदाऱ्या ती पार पाडत असते. जर आता महिलाच आत्महत्या करत असतील तर कुटुंबव्यवस्थेचा कणा मोडेल. पाणी टंचाई आणि सावकारी कर्जाचा सर्वात जास्त तणाव महिलांना सहन करावा लागत आहे. नापिकीमुळे कर्ज फेडता येत नाही, यामुळे आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकूणच आता महिलांच्या आत्महत्या चिंताजनक आहेत, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी म्हटले.

संबंधित लेख