अर्थसंकल्पातील फसवणुकीबद्दल जनतेचा सरकारच्या नावाने 'शिमगा' - धनंजय मुंडे

23 Mar 2016 , 01:46:20 AM

राज्यात शिमग्याचा सण सुरू असून, दुष्काळग्रस्तांसह संपूर्ण जनता सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या फसवणुकीबद्दल सरकारच्या नावाने शिमगा करत आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली. विधानपरिषदेतील अर्थसंकल्पावरील चर्चेला आज मुंडे यांच्या भाषणाने सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

अधिवेशनाच्या सुरुवातीला झालेले राज्यपालांचे भाषण, त्यावरील मुख्यमंत्र्यांचे उत्तर याचे प्रतिबिंब राज्याच्या अर्थसंकल्पात उमटणे अपेक्षित असताना या तिन्हीचा कुठेही ताळमेळ लागत नाही. त्यामुळे हा भरकटलेला आणि दिशाहीन अर्थसंकल्प आहे. राज्यपालांच्या भाषणातील अनेक घोषणांसाठी अर्थसंकल्पात तरतूदच केलेली नाही. हे म्हणजे राज्यपालांच्या तोंडून खोटे वदवून घेऊन राज्याच्या जनतेची केलेली फसवणूक आहे, असं मुंडे म्हणाले.

शेजारच्या गुजरात, कर्नाटक आणि नवनिर्मित तेलंगणा राज्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासनिधीवरील खर्च कमी असल्याचं मुंडे यांनी उदाहरणांसह दाखवून दिलं आणि यामुळे राज्याची मान शरमेनं खाली गेली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सलग दोन वर्षे अर्थसंकल्प नेमका १८ मार्चलाच सादर होतोय, ही तारीख कदाचित सरकारसाठी 'लकी' असेल, परंतु राज्यातील जनतेसाठी मात्र 'अनलकी' ठरतेय, असंही ते म्हणाले.

25 हजार कोटी रूपये शेतीसाठी देऊन कृषीप्रधान अर्थसंकल्प मांडल्याची अर्थमंत्र्यांची ही थाप असून, प्रत्यक्षात कृषी खात्याला मागील वर्षीपेक्षा 1 हजार कोटी रूपयांची तरतूद कमी देण्यात आली आहे. 25 हजार कोटी रूपयांचा आकडा हा अनेक खात्यातील तरतूदींची एकत्रित जुळवणी करणारा आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक करणारा आहे. 

राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल टीका करताना, राज्याची आर्थिक शिस्त बिघडून गेली आहे. मागील दोन वर्षात राज्यावरचे एक रूपयाचे कर्जही सरकारला कमी करता आलेले नाही. विश्वस्त म्हणून काम करणाऱ्यांना एकूण निधीपैकी केवळ 56 टक्के निधी खर्च करता यावा, हे दुर्दैव आहे, अशी टीका मुंडेंनी केली. 3278 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना शेतकरी स्वाभिमान वर्ष कसले साजरे करता? असा सवाल उपस्थित करतानाच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर मंत्र्यांची डोक्यावरून मिरवणूक काढली असती, असेही ते पुढे म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पात एका व्यायामशाळेसाठी निधी ठेवल्याचा उल्लेख आहे, परंतु शिवस्मारकासाठी 100 कोटी रूपये ठेवल्याच्या नोंदीचा उल्लेख नाही,  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केल्याचा उल्लेख नाही. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने काढलेल्या महामंडळाला निधी दिला नाही. स्वर्गीय मुंडे यांना भाजपने ते हयात असतानाही आणि आता नसतानाही त्रास दिला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या एकूण ५७ हजार कोटींच्या विकासनिधीपैकी ५५ हजार कोटी भाजपकडील खात्यांना, तर अवघे २ हजार कोटी शिवसेना मंत्र्यांच्या खात्यांना देण्यात आले आहेत. त्यापैकी दीड हजार कोटींहून अधिक निधी आरोग्य विभागाचा आहे. शिवसेनेच्या शिव आरोग्य योजनेलाही निधी मिळू शकला नाही. शिवसेना मंत्र्यांवर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प, विधान परिषदेत सादर करण्याची वेळ शिवसेना राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर आली  व त्यांनी मान खाली घालून तो वाचला, त्याबद्दल केसरकरांप्रमाणे आपल्यालाही दु:ख वाटत असल्याचे मुंडे म्हणाले.

मागील अर्थसंकल्पातील 70 टक्क्यांपैकी 50 टक्के योजना साध्या सुरूही करता आल्या नाहीत, हे त्यांनी योजनेच्या पुराव्यांसह सभागृहात सांगितले. पालकमंत्री पांधण रस्ते योजना, माझी कन्या भाग्यश्री, आमदार ग्रामविकास योजना या योजनांची लक्तरेही त्यांनी सभागृहात काढली. शिवसेनेची अवस्था ही "क्या अजीबसी जिद्द थी हम दोनों की, तेरी मर्जी हमसे जुदा होने की, और मेरी तेरे पिछे तबाह होने की" अशी झाली असल्याचे सांगतानाच त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप "काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता" या कवितेने केला.संबंधित लेख