आंबेडकरी विचारांना दडपण्याचा सरकारचा प्रयत्न

26 Mar 2016 , 08:55:46 PM

शिक्षण व्यवस्थेवर भाजप आणि संघाच्या विचारांचे चाललेले अतिक्रमण, त्याचप्रमाणे फर्ग्युसन कॉलेज, जेएनयू आणि रोहित वेमुल्ला प्रकरणातून भाजप आणि आरएसएसची समोर आलेली अरेरावी, या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने येत्या रविवारी पुण्यात भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण मार्गाने हा निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. हजारो विद्यार्थी त्यात सहभागी होणार होते. मात्र मोर्चा निघण्याआधीच त्याचा धसका सरकारने घेतला असून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

शिक्षणाचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख आहे. अशा शैक्षणिक वारसा लाभलेल्या शहरात शिक्षणक्षेत्रामध्ये होणारा संघाच्या विचारांचा हस्तक्षेप निषेध करण्यासारखा आहे, अशी टीका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केली आहे. आंबेडकरी विचारांना दडपण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शांततापूर्ण रीतीने विद्यार्थी निषेध व्यक्त करणार होते. याआधीही विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राज्यात विविध ठिकाणी अनेक मोर्चे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने काढले आहेत. हे सर्व मोर्चे शांततेत पार पडले आहेत. त्यात कोणताही अनुचित प्रकार झालेला नाही. या सर्व गोष्टींची माहिती पोलिस प्रशासनाला देऊनही केवळ सरकारच्या दबावामुळे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, असा आरोप संग्राम कोते पाटील यांनी केला. या पुढेही मोर्चासाठी परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख