डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर उत्तम क्रिकेटपटू घडावेत – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभेच्छा

07 Apr 2016 , 12:48:19 AM

बारामती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम उभारणीची तयारी अनेक वर्षे सुरू होती, आता ते प्रत्यक्षात साकारले आहे, तेव्हा त्याचा लाभ उत्तम क्रिकेटपटूंची कामगिरी घडण्यासाठी व्हावा, अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी स्टेडियमचे उद्घाटन करताना दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून या स्टेडियमचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या वेळी सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करीत असल्याचे सांगत सुप्रियाताई सुळे यांनी एका चांगल्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहण्याची संधी मिळाली, अशा शब्दांत आनंद व्यक्त केला. तर स्टेडियममधील क्रिकेट पिचचे पूजन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. लोकप्रिय क्रिकेटपटू अजिंक्य राहणे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के तसेच भारतीय क्रिकेट संघातील काही दिग्गज खेळाडूंसह निवृत्त खेळाडू  या प्रसंगी उपस्थित होते.

 मुंबईकरांनी मला १० वर्षं त्यांच्या क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष केलं. मला आनंद आहे की या नंतर देशाच्या क्रिकेट बोर्डाचंही मला अध्यक्ष केलं आणि या देशाने मला आशियाच्या आणि जगाच्या क्रिकेट बोर्डाचाही अध्यक्ष केलं. याचा  मला आनंद आहे. पण मग मी विचार केला की, जगाच्या क्रिकेट बोर्डाचं अध्यक्षपद घ्यायचं आणि आपल्या गावात मात्र क्रिकेटचं वातावरण घडावं असं काहीच नाही, हे वागणं काही बरं नाही. यात बदल करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांची मी साथ घेतली आणि हे स्टेडियम उभारलं गेलं,” असे मनोगत शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केले.

 या स्टेडियमसाठीची तयारी अनेक वर्षे चालू होती मात्र ही जबाबदारी नदीम मेमन यांच्याकडे सोपवल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये हा सामना होईल अशी तयारी त्यांनी आज करून दाखवली आहे, अशा शब्दांत त्यांनी स्टेडियमच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त केले आणि नदीम यांना धन्यवाद दिले. 

 या वेळी मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाले, “बारामतीकरांनी जो आदर आणि प्रेम दाखवलं त्याबद्दल आभार मानावे तेवढे कमीच. मुंबई क्रिकेट असोसिएशनबरोबर पवारसाहेब जोडले गेले तेव्हापासून सोयीसुविधा सुधारत गेल्या. आता हे स्टेडियमच बघा किती चांगलं झालं आहे! मुंबईत बरीच वर्षं पावसाळ्यात प्रॅक्टिस कुठे करायची हा मोठा प्रश्न होता. पण पवारसाहेबांनी पावसाळ्यातही प्रॅक्टिस करता येईल, अशी सुविधा करण्याकडे लक्ष दिलं. सरावासाठी मिळणारा असा आधार म्हणजे आशीर्वादच. पण त्याचा उपयोग प्रगतीसाठी करणं हे आपल्या हातात असतं.

 क्रिकेट हा महिला-पुरुष दोघांचाही खेळ आहे, आपण पाहिले तसे भारतासाठी वर्ल्ड क्रिकेट खेळायचे स्वप्न बालवयातच पाहावे, असा प्रेमळ सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. 

 या वेळी बारामतीचे नगराध्यक्ष योगेश जगताप म्हणाले, “गॉड ऑफ क्रिकेट आणि गॉड ऑफ मासेस यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा होत आहे. याचा आनंद वाटतो.

 स्टेडियमचे ग्राऊंड ७० मीटरचे असल्याने ते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्टेडियमवरचा पहिला वहिला सामना आज महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा रणजीचा टी-20 सामना होता. बारामतीकरांना ही पर्वणीच मिळाली. ग्राऊंडवर दोन खेळपट्ट्या असलेल्या या स्टेडियममध्ये १४ प्रॅक्टिस विकेट सेंटर, १० विकेट पिच आहेत. बारामतीत क्रिकेट कोचिंग अॅयकॅडमीही स्थापन करण्याचा पवार साहेबांचा मनोदय असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची संधी यातून मिळावी, हा हेतू आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

 


संबंधित लेख