मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा

12 Apr 2016 , 12:46:06 AM

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारविरोधात आज भव्य हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा निघाला. आझाद मैदना येथे पोहोचल्यानंतर एका विराट सभेत या मोर्चाचे परिवर्तन झाले. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ , मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, हे नेते या हल्लाबोल मोर्चात सहभागी झाले होते.
‘महानगरपालिका ही लोकांना सुविधा देण्यासाठी नाही तर मातोश्रीला पोसण्यासाठीच काम करत आहे,’ असा रोखठोक आरोप या वेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला. महापालिकेत रस्ते बांधकामांत मोठा घोटाळा झाल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत, याकडे लक्ष वेधून या घोटाळ्यांची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘गृहनिर्माण धोरणाबाबत स्पष्टता नाही. पुनर्विकासाचे प्रकल्प ठप्प आहेत. गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गंभीर झाला आहे, तरी त्याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत,’ असा आरोप सचिन अहिर यांनी केला. स्मार्ट सिटीच्या नावाने मुंबईकरांची फसवणूक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोर्चाला उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठबळ देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य करीत महानगरपालिकेच्या कारभारावरही जोरदार टीका केली. ‘मुंबई महापालिकेचा कारभार हा शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे,’ असा आरोप त्यांनी केला. ‘देवनार डंपिंग ग्राउंडला आग लागते, नालेसफाईत २०० कोटींचा घोटाळा होतो. हे सरकारला माहीत असताना त्याची कोणतीही चौकशी होत नाही,’ हे आश्चर्यकारक असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंमत असेल तर त्याची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी तटकरे यांनी केली. एवढंच नाही तर ‘कॅगच्या माध्यमातून महापालिकेचे ऑडिट करावे अशी मागणीही त्यांनी मोर्चाला संबोधताना केली. स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी महापालिकेचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हे सरकार आंधळं, मुकं आणि बहिरं आहे. त्यांना मुंबईकरांचे हाल दिसत नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेस या प्रश्नावर आक्रमक होऊन त्याचा जाब विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विचारेल,’ असेही तटकरे याप्रसंगी म्हणाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मोर्चाला हजेरी लावून मुंबईकरांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचे संकेत दिले. ‘मुंबईच्या नागरी प्रश्नांवरून सरकारला दोन्ही सभागृहांत सळो के पळो करून सोडू,’ असे यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. मुंबईकरांच्या प्रश्नाकडे महापालिका आणि राज्य सरकारलाही देणे घेणे नाही, अशा शब्दांत त्यांनी सद्यस्थिती कथन केली. अशा सेना-भाजपला आगामी महापालिका निवडणुकीत त्या देवनार डंपिंग ग्राऊंड मध्ये गाडण्याचा संकल्प राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याप्रसंगी ठणकावून सांगितले की, झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा आहे. हे सरकार फक्त घोषणांचे सरकार आहे. या सरकारने जगणं महाग आणि मरणं स्वस्त केले आहे. पुरोगामी चळवळीं बरोबरच बचत गटांची चळवळ चिरडून काढण्याचा सरकारने डाव आखला आहे. अंगणवाडींचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून ठेकेदारांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत.
मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या विश्लेषणात्मक पद्धतीने सांगितले की, राज्याची स्थिती वाईट आहेत. कधी नव्हे एवढी आंदोलने गेल्या १६ महिन्यात होत आहेत. जनविरोधी धोरणे आखली जात असल्यमुळेच लोकांमध्ये राग आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्याच धुंदीत आहेत. राज्यात दुष्काळ आहे पण भाजपचे कार्यक्रम मात्र लाखो रूपयांच्या मंचावरून केले जात आहेत. देवनार डंपिंगला लागलेल्या आगीला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहे.

संबंधित लेख