कोकणासाठी झाले नवे पर्यटनधोरण; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नांना यश

13 Apr 2016 , 02:58:43 AM

कोकणाच्या विकासाकरिता नवीन पर्यटनधोरण तयार करण्यात आले आहे. यामध्ये विशेषत: सागरी पर्यटन आणि नौकामय पर्यटनविकास यावर भर देण्यात आला आहे. याकरिता अनेक इन्सेंटिव्ह देण्यात आलेले असून गुंतवणूक वाढवण्याबाबतचा विचार पर्यटनधोरणात झाला आहे. या धोरणाअंतर्गत रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय कार्यरत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली होती, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करते, पण राज्य शासन कोकणाच्या दृष्टीने स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ तयार करीत आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व पर्यटन विकास महामंडळ यांचा एकत्रित समावेश यात असणार आहे. 
केंद्र शासनाने तयार केलेल्या स्वदेशदर्शनाच्या कार्यक्रमात राज्य शासनाने दाखल केलेल्या  आराखड्याला मंजुरी मिळाली होती. याअंतर्गत १ मार्च २०१३ रोजी ८२.१७ कोटी रुपये देण्यात आले आणि त्याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, मीठगाव, सागरेश्वर आदी ठिकाणी पर्यटन निवास, बीच सेफ्टी आदींबाबतचा आराखडा तयार करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पर्यटनस्थळांचा विकास करण्याकरिता ३ हजार ५५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने तो कार्यान्वित करण्यात येणार आहे. मेक इन इं‍डियाच्या माध्यमातून पर्यटनक्षेत्रात झालेल्या आठ सामंजस्य करारांतील सात सामंजस्य करार कोकणच्या विकासासंदर्भात आहेत. या माध्यमातून गुंतवणूक वाढून रोजगार निर्माण होणार आहे.
पर्यटनासाठी क्षेत्राच्या संदर्भात सीआरझेडच्या अडचणी होत्या, त्याकरिता केंद्र शासनाकडे विनंती करण्यात आली असून संबंधित प्रकल्पांकरिता सीआरझेड क्लिअरन्स सोपे होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याचबरोबर सागरीजीवनाकरिता १३९० एकर जमीन दाखवली होती तर कोकणात एवढी मोठी जमीन अधिग्रहण करण्यास विरोध होत आहे. परिणामी ३५० एकर जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी वर्ग करण्यात आला आहे.
निवास व न्याहारी या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत २०१५ अखेरपर्यंत ७२० योजनाधारकांची नोंद झाली होती ती आता ८२० पर्यंत पोहोचली आहे. एलिफंटा महोत्सव, कासव महोत्सव, सिंधुदुर्ग महोत्सव, रायगड महोत्सव आदींच्या  माध्यमातून यावर्षी विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. एलिफंटाचा पर्यटनदृष्ट्या विचार करता एकात्मिक विकास करण्याची योजना तयार करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 
कोकणासाठी जाहीर झालेल्या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली, ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.

संबंधित लेख