कंपनी व्यवहारात पंकजा मुंडे यांच्याकडून दोन डीन क्रमांकांचा वापर - नवाब मलिक

23 Apr 2016 , 08:16:41 PM

३६ हून अधिक कंपन्यांच्या संचालिका असलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी कंपनी व्यवहारांत दोन वेगवेगळ्या डीन नंबरचा वापर केला आहे, अशी माहिती देऊन पंकजाताईंचा डबल रोल, त्यांच्या पतीच्या नावाचा डबलरोल आणि आता कंपनी व्यवहारातील डीन क्रमांकाचा डबल रोल दिसत आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी काढले. या डबलरोलचा घोळ पंकजाताईंनी जनतेसाठी स्पष्ट करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
खाजगी कंपनीच्या संचालकासाठी डीन नंबर आवश्यक असतो, असे सांगून ते म्हणाले की, पंकजाताईंनी दिलेला पहिला डीन क्रमांक ०२२४१३९३ असून तो ‘पंकजा चारुदत्त पालवे’ या नावाने आहे. त्यामध्ये वडिलांचे नाव ‘मुंडे पांडुरंग गोपीनाथ’ असे आहे. दुसरा डीन नंबर ०२२४१३९३ पंकजा चारुदत्त पालवे नावाने असून येथे मात्र वडिलांचे नाव ‘मुंडे गोपीनाथ’ असे उल्लेखिलेले आहे.
या दोन डीन नंबरचा वापर करून त्यांनी अनेक कंपन्यांचे संचालकपद भूषविलेले आहे आणि रॅडिको कंपनीतदेखील या दोन डीन नंबरच्या आधारे त्या संचालकपदी राहिल्या, असे ते म्हणाले. एक व्यक्ती नावाचा फेरफार करते, वडिलांचे नाव दोन प्रकारे लिहिते याचा अर्थ काय, असे ते म्हणाले.
सार्वजनिक ठिकाणी पंकजाताई आपल्या वेबसाइटवरच्या उल्लेखाप्रमाणे पतीचे नाव डॉ. अमित पालवे असल्याचे सांगतात तर २०१४ सालच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी पतीचे नाव डॉ. चारुदत्त पालवे असे नमूद केले. त्यांचे पती अमित पालवे हे सध्या दोन नावांनी व्यवहार करीत आहे. राजकीय वर्तुळात ‘अमित पालवे’ तर उद्योग व्यवहारात ‘चारुदत्त पालवे’ अशी नावे वापरण्यामागे काय गौडबंगाल आहे याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पूर्वी होत्या पाणीवाली बाई, आज आहेत दारूवाली बाई
राज्यात भयंकर दुष्काळ पडला असताना दुष्काळग्रस्त जनतेला पाणी देण्याला प्राथमिकता असावी. परंतु राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजाताई मुंडे या बिअर कारखान्यांचे पाणी बंद करण्यास विरोध करीत आहेत. सत्तरच्या दशकात मृणालताई गोरे, अहिल्याताई रांगणेकर आदी महिला नेत्या जनतेच्या पाणीप्रश्नांवर रान उठवत. त्यामुळे त्यांना गल्ली ते दिल्ली पाणीवाली बाई म्हणून ओळख मिळाली होती. आज मात्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री दुष्काळाचे संकट ओढवलेले असताना दारू कारखान्यांचे पाणी बंद करण्यास विरोध करीत आहेत. राज्यातील जनतेला पाणी मिळाले नाही तरी चालेल पण स्वतःच्या दारू कारखान्याला पाणी मिळाले पाहिजे ही त्यांची भूमिका त्यांच्या पदाला न शोभणारी आहे, अशी टीकाही या वेळी नवाब मलिक यांनी केली. राज्यातील जनतेला त्या पाणीवाली बाई वाटण्याऐवजी दारूवाली बाई वाटू लागल्या तर नवल नाही, असे ते म्हणाले.

संबंधित लेख