शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा - अॅड. रविंद्र पगार

26 Apr 2016 , 12:22:17 AM

निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तातडीने कोरा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे. बागलाण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी अॅड. रविंद्र पगार बोलत होते. 

बागलाण सारख्या शेतीप्रधान तालुक्यात शेतकरी मोठया प्रमाणात आत्महत्या करत आहेत ही चिंतेची बाब आहे. अभूतपूर्व पाणी टंचाई, अवकाळी पाऊस व दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरकारकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन फक्त घोषणाबाजी न करता शेतकऱ्यांपर्यंत तातडीने मदतीचे पॅकेज पोहचवून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांस दिलासा द्यावा व निवडणुक काळातील घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली. जिल्ह्यात पिण्याच्या पाणी प्रश्नासोबत, जनावरांच्या पिण्याच्या आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा सरकारने पाण्याचे चुकीचे नियोजन केल्यानेच मोठया प्रमाणात पाण्याचे संकट उभे राहिले आहे. परंतु यावर सरकारकडून कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नैसर्गिक दुष्काळा सोबतच शासनाच्या नियोजनाच्या दुष्काळाचे चटके सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना भोगावे लागत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी यावेळी बोलताना केला.

यावेळी पक्ष निरीक्षक उत्तमराव सहाणे, माजी आमदार संजय चव्हाण, विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरनार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश गोसावी, जिल्हा पदाधिकारी पांडुरंग सोनवणे, फईम शेख, जिल्हा परिषदेच्या सभापती उषा बच्छाव, सदस्य शैलेश सूर्यवंशी, पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे, सदस्या रेखा ठाकरे, नगरपालिकेचे गटनेते काका रौंदळ, खंडू जिभाऊ सोनवणे, खेमराज कोर, सुरेखा बच्छाव, वंदना भामरे, उषा भामरे, रेखा शिंदे, बाळासाहेब बिरारी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख