मुंबई महानगरपालिकेतील कोट्यवधींच्या रस्ते घोटाळ्यात कंत्राटदारांची पार्टनरशिप कोणाशी ? - सचिन अहिर

27 Apr 2016 , 12:04:57 AM

मुंबई महानगरपालिकेतील कोट्यवधींच्या रस्ते घोटाळ्यात कंत्राटदारांची कोणाशी पार्टनरशिप आहे आणि निविदा कशा निघाल्या हे उघड करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. या घोटाळ्याप्रकरणी समाधानकारक चौकशी न झाल्यास न्यायालयीन प्रक्रिया करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

'करून दाखवलं’ म्हणणाऱ्या लोकांना आता 'चोराच्या उलट्या बोंबा' असं म्हणावं लागेल, असा टोला अहिर यांनी लगावला. शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी म्हणतात आम्ही रस्ते चकाचक केले आहेत आणि महापौरांच्या मागणीनंतर मुंबई महानगरपालिका आयुक्त कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं अहवालात उघड करतात, याचा अर्थ काय, असा सवाल सचिन अहिर यांनी केला. राज्य सरकारमध्ये प्रशासकीय घोटाळे झाल्यास मंत्र्यांना जबाबदार धरले जाते, मग मुंबई महानगरपालिकेमधल्या घोटाळ्याचं खापर फक्त प्रशासन आणि कंत्राटदारांवर का? सत्ताधारी म्हणून तेवढीच जबाबदारी शिवसेना आणि भाजपची आहे, असे अहिर म्हणाले.

हा भ्रष्टाचार उघड केल्याचे श्रेय भाजपने घेणे दुर्दैवी आहे, असे मत यावेळी अहिर यांनी मांडले. सत्तेत राहून या भ्रष्टाचाराला साथ का देता? सत्तेचा मलिदा खाऊन आरोप का करता, असेही सवाल त्यांनी केले. “राज्य सरकारमध्ये राहून शिवसेना जे करत आहे तेच भाजप महानगर पालिकेत करत आहे. या कुरघोडीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास सोसावा लागत आहे. ते आम्ही होऊ देणार नाही, असे अहिर यांनी सांगितले.

संबंधित लेख