दुष्काळग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सरकारविरूद्ध संघर्ष अटळ – सुनील तटकरे

03 May 2016 , 05:38:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच दोन दिवसीय मराठवाडा दौरा केला. औरंगाबाद, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून त्यांनी यावेळी शेतकऱ्यांबरोबर संवाद ही साधला. सरकारने १५ मे पर्यंत जर दुष्काळावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय पर्याय रहाणार नाही असा इशाराही त्यांनी या दौऱ्याच्या सांगतेवेळी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. १५ मे पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलिप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हे दौऱ्यात सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिलाध्यक्ष फौजिया खान, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, माजी खासदार सुरेशराव जाधव, परभणी जिल्हाध्यक्ष आमदार विजय भांबळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मधुसूदन केंद्रे, शंकर अण्णा धोंडगे यावेळी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी सरकारने दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात चारा छावण्या तातडीने सुरू करा असेही ते म्हणाले. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शुल्कमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. जलयुक्त शिवारची कामे अपूर्ण आहे. सरकार जलयुक्त शिवारबाबत जो काही दावा करत आहे तो खोटा आहे. मराठवाड्यातील फळबागांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. या सर्व गोष्टी करण्यासाठी १५ मे पर्यंत सरकारला वेळ देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. नाहीतर सरकार विरोधात रस्त्यावर संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भीषण दुष्काळ असूनही रोजगार हमीची कामे बंद आहेत. त्यामुळे गावाकडून शहरांकडे स्थलांतर होत आहे. शेतमजूरांना अन्न धान्याचा पुरवठा होत नाही. शंकरअण्णा सरकार विरोधात न्यायालयीन लढाई लढत आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस यानंतर रस्त्यावरची लढाई लढेल. एलबीटी साठी ८ हजार कोटी माफ करता मग शेतकऱ्यांना कर्ज माफी का नाही असा सवाल तटकरे यांनी यावेळी विचारला. महाराष्ट्र सरकारने किमान उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला बुधवारी सुरूवात झाली. त्यांनी या दोन दिवसात तीन जिल्ह्यांचा दौरा केला. सुरुवातीला औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडला त्यांनी भेट दिली. येथे शेतकरी आणि गावकऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. शिवाय या भागातील फळबागांची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथील कै. अविनाश पतंगे आणि कै. कुंडलीक मुंडे या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर हिंगोली येथे हिंगोली जिल्हा दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सध्याची दुष्काळी स्थिती आणि करायच्या उपाययोजना या बाबत तटकरे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. यानंतर हिंगोली येथेच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर औंढा तालुक्यातील पुरजळ गावाला त्यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या तलावाची पहाणी केली. वसमत येथे दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या डाळींबाच्या बागांचीही तटकरे यांनी पाहणी केली. पुढे परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर गावात शेतकऱ्यांबरोबर तटकरे यांनी संवाद साधला. त्यानंतर परभणी येथील पत्रकार परिषदेनंतर तटकर यांच्या दौऱ्याची सांगता झाली.

संबंधित लेख