मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

03 May 2016 , 05:55:56 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा केला. पक्षाचे कार्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवन येथे ध्वजवंदन करून महाराष्ट्र दिनाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह हुतात्मा चौक येथील स्मारकाला भेट दिली व तेथे हुतात्म्यांना मानवंदना दिली.
त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई महिलाध्यक्ष सुलेखा पेडणेकर, महिला प्रदेश चिटणीस कामिनी जाधव तसेच मुंबई विभागाशी निगडित इतर महनीय पदाधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच केलेल्या मराठवाड्यातील दुष्काळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र दिनी राज्यासमोरील संकटाची जाणीव करून देत कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करण्याचं आवाहन केलं.
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही आक्रमक भूमिका मांडत सरकारला जाब विचारला की वेगळा विदर्भ मागणारे महाराष्ट्र दिन कोणत्या तोंडाने साजरा करणार? संयुक्त महाराष्ट्राला विरोध करुन वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही.
विदर्भाच्या बाबतीत आपली भूमिका अगोदर स्पष्ट करावी, मगच महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रम साजरा करावा.
राज्य दुष्काळाशी सामना करत असताना सत्ताधारी मात्र जल्लोषात मग्न आहेत. होंर्डिंग, बॅनर, झेंडे, उत्सवावरील लाखो रुपयांचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करणं अपेक्षित आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजपा युती सरकारने केलेला भ्रष्टचार लोकांपर्यँत पोचवणार असल्याचं त्यांनी यावेळी सुस्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी भ्रष्टचारच्या विरोधात बोलतात. त्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा मनोदय व्यक्त करतात. मात्र त्यांच्याच पक्षाचे मुंबई महापालिकेत नगरसेवक मात्र पंतप्रधानांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत भ्रष्टाचारामध्ये हात धुवून घेत आहेत.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रसंगी नागपूरमध्ये साजरा झालेला काळा दिन म्हणजे भाजपाचा दुहेरी चेहरा उघड झाल्याचा आरोप केला.

संबंधित लेख