कांद्याला हमीभाव द्या अन्यथा ६ मे रोजी नाशिकमध्ये तालुकावार रस्ता रोको आंदोलन - अॅड.रविंद्र पगार

03 May 2016 , 09:54:47 PM

सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा अन्यथा येत्या ६ मे  रोजी जिल्ह्यात तालुकावार रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसेच दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रत्यक्ष जिल्हा परिषद गटवार दौरा सुरु आहे. कळवण तालुक्यातील बैठकीत पगार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये शेतकऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची मनोगते जिल्हाध्यक्ष पगार यांनी जाणून घेतली. 
शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नाही. त्यामुळे सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमी भाव जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी यावेळी बोलताना केली. कांद्याचे भाव वाढल्यावर भाव स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे आज रोजी कांद्याचे भाव अत्यंत कमी झाल्याने सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेद्वारे हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने येत्या ६ मे  रोजी जिल्ह्यात रस्त्यावर उतरून तालुकावार तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी दिला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.
यावेळी रविंद्र पगार यांच्यासह नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, सभापती उषा बच्छाव, सदस्य नितीन पवार, पंचायत समितीच्या सभापती संगीता ठाकरे, नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, नगरसेवक बापू पगार, मनोज शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रमेश पवार, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन मोहिते, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, जिल्हा पदाधिकारी नारायण हिरे, पांडुरंग पाटील युवक अध्यक्ष प्रवीण रौंदळ, सरपंच मीना गावीत यांनीही आपले विचार व्यक्त केले. या बैठकीस स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.   


संबंधित लेख