राष्ट्रवादी भवन येथे आढावा बैठक

11 May 2016 , 11:22:29 PM

राज्यातील दुष्काळी स्थिती आणि औरंगाबाद येथे १६ मे रोजी होणाऱ्या दुष्काळ परिषदेचा आढावा आज राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलिप वळसे पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. 

 मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १६ ते २५ मे यादरम्यान दुष्काळ परिषदा घेतल्या जाणार असल्याची माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. औरंगाबाद येथे होणाऱ्या दुष्काळी परिषदेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. शिवाय दुष्काळावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात, सरकारने कोणती पाऊले उचलावीत, यावरही चर्चा केली जाणार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच आज संध्याकाळी काँग्रेस नेत्यांबरोबर विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहितीही तटकरे यांनी यावेळी दिली. सध्याची राजकीय परिस्थिती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित काम करण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 दरम्यान आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणिसपदी दक्षिण कराडचे अविनाश मोहीते यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मोहीते यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून प्रा. एस. डी. पाटील यांचीही नियुक्ती करण्यात आली. मोहीते यांनी आता राज्यात काम करून संघटनेला शक्ती द्यावी अशी भावना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तर पक्षाने दिलेल्या संधीबद्दल अविनाश मोहीते यांनी आभार व्यक्त केले. 

संबंधित लेख