दुष्काळनिवारणाची कामे गतीमान करण्यासाठी मराठवाड्यात 'मिनी मंत्रालय' सुरु करण्याची राष्ट्रवादीची मागणी

13 May 2016 , 10:12:17 PM

मराठवाड्यातील दुष्काळनिवारणाच्या कामांना गती देण्यासाठी पुढील किमान दोन महिने मराठवाड्यात 'मिनी मंत्रालय' स्वरुपाची यंत्रणा कार्यान्वीत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबतचे संयुक्त निवेदन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांनी दिले. 1993 मध्ये लातूर भुकंपाच्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री Sharad Pawar यांनी घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सुचवले आहे.

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी नुकताच दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, नांदेडसह अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यातील पाहणीनुसार तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांना विविध उपायययोजना त्यांनी सुचवल्या आहेत. तसेच यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याच्या दुष्काळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून सरकारच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्या भीषणतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. मराठवाडावासीयांना दिलासा देऊन त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळाची एक बैठक तातडीने औरंगाबाद येथे घेण्याची मागणी पवार आणि मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्यावर्षी मे महिन्यात या आशयाचे आश्वासन करुन दिले होते, याची आठवणही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात अनुभवलेल्या परिस्थितीतनंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटत चालला असल्याचे प्रकर्षाने जाणवल्याचे नमूद करुन आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता उच्च न्यायालयाने सूचित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी व अन्य मदत देण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अन्यथा कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस निर्णायक आंदोलन उभे करेल, असा इशाराही या निवेदनात अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या संयुक्त निवेदनात दिला आहे.

संबंधित लेख