सरकारकडून एकनाथ खडसे यांना वाचविण्याचा प्रयत्न - नवाब मलिक

19 May 2016 , 10:47:23 PM

राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कथित पीए गजानन पाटील याने डॉ. रमेश जाधव यांच्याकडून मागितलेल्या ३० कोटींच्या लाच प्रकरणी सरकारकडून खडसे यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. बुधवारी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच गजानन पाटील याला लोकायुक्तांच्या भीतीनेच एसीबी कडून अटक करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. ७ मे रोजी चौकशी सुरु झाल्यानंतर ९ तारखेला एफआयआर नोंदविण्यात आली व १३ तारखेला डॉ. रमेश जाधव यांची लोकायुक्तांकडे सुनावणी होती त्याच दिवशी गजानन पाटील याला अटक करण्यात आली. म्हणजेच प्रक्रिया सुरू झाली नाही तोपर्यंत एसीबींकडून कोणतीही कारवाई झाली नाही, याचाच अर्थ सरकार एकनाथ खडसेंना वाचवते आहे, असे मलिक म्हणाले.

शांताराम भोई, उन्मेश महाजन यांना अटक करा.
गजानन पाटील हा आपल्या आस्थापनेवर नसल्याचे एकनाथ खडसे सांगत आहेत. परंतु त्यांच्या आस्थापनेवर नसलेले अनेक लोक त्यांना लक्ष्मीदर्शन घडवून देण्यासाठी सक्रीय पद्धतीने काम करत आहेत, असा टोला मलिक यांनी लगावला. एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना त्यांचे पीएस म्हणून काम पाहणारे शांताराम भोई हे यातील मुख्य सूत्रधार आहेत. ते विधानसभा अध्यक्षांच्या आस्थापनेवर असताना देखील एकनाथ खडसेंच्या कार्यालयात खडसेंसाठी काम करीत आहेत. या सर्व प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार शांताराम भोई, ओएसडी उन्मेश महाजन यांना अटक केली गेली पाहिजे. या दोघांना अटक केल्यास कोण-कोणत्या प्रकरणात किती लक्ष्मीदर्शन कोणाकडून झाले आहे याची सर्व माहिती मिळेल तसेच अशी अनेक प्रकरणे बाहेर येऊ शकतील, असे नवाब मलिक म्हणाले.

कर्नाटकच्या धर्तीवर राज्यातील लोकायुक्त कायद्यात बदल करा
तसेच या पत्रकार परिषदेदरम्य़ान, कर्नाटक राज्याने ज्या पध्दतीने लोकायुक्त कायद्यात सुधारणा केली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील लोकायुक्त कायद्यात बदल केला जावा आणि लोकायुक्तांना अधिकार दिले जावेत, अशी मागणी मलिक यांनी केली. सत्तेत येण्यापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने लोकायुक्त कायद्यात बदल करण्याची मागणी करीत होते. मात्र सत्तेत येऊन दीड वर्ष झाला तरी अद्याप त्यांनी कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने कोणतीही हालचाल झालेली नाही. कदाचित लोकायुक्त कायद्यात बदल केल्यास संपूर्ण मंत्रीमंडळाला तुरुंगात जावे लागेल अशी भीती त्यांना वाटत असावी, असा टोला नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्याना लगावला.
जर तुमची नियत साफ असेल, भ्रष्टाचारमुक्त व स्वच्छ कारभार करण्याची तुमची इच्छा असेल तर या राज्यात एका आठवड्याच्या आत मंत्रीमंडळाची बैठक बोलावून कर्नाटकच्या धर्तीवर लोकायुक्त कायद्यात बदल करून तो लागू करावा असे नवाब मलिक म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो उपस्थित होते.

संबंधित लेख