राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक

19 May 2016 , 11:14:38 PM

राज्यसभेच्या एका जागेसाठी पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची शिफारस एकमताने केंद्रातील नेत्यांना करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक आज राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, गटनेते जयंत पाटील, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, पद्मसिंह पाटील, मधुकरराव पिचड, विजयसिंह मोहीते पाटील, गणेश नाईक, आ. हेमंत टकले, आ. सुमनताई पाटील, शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ उपस्थित होते.
 
संसदीय मंडळाच्या बैठकीत राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबतही चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीचे संख्याबळ पहाता राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस सहज जिंकू शकते. या जागेसाठी पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची शिफारस करण्यात येणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले. तर विधापरिषदेच्या जागांबाबतचा निर्णय़ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रातील पक्षश्रेष्ठी व नेते घेतील असे ही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने आपला फॉर्म्यूला काँग्रेसला दिला आहे. शिवाय काँग्रेसनेही आपले मत त्याबाबत मांडले आहे. आता पुढील दोन दिवसात याबाबतचा निर्णय दिल्लीत होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. 

संबंधित लेख