रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

24 May 2016 , 09:54:12 PM

रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ८ मे ते ११ मे या तीन दिवसांच्या कालावधीत मुंबईतून रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन महिला अचानक गायब झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचे आयजी ए. के. सिंग तसेच एडीजी कनकरत्न यांची भेट घेऊन एक निवेदन देण्यात आले. प्रत्येक रेल्वेच्या डब्यात तसेच प्रत्येक फलाटांवरही सीसीटीव्ही कॅमेरे लावले जावेत अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली. यातील एक महिला कल्याण स्थानकातून ८ मे ला मंगला एक्सप्रेसने पती आणि मुलीसह शोराजूरला निघाली होती. उडपी स्थानकात ही रेल्वे पोहचली तेव्हा ती महिला आपल्या आसनावर नव्हती. पुढे कुन्नूर स्थानकात या बाबत तक्रार नोंदवण्यात आली. मात्र तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना दुसऱ्या दिवशी समोर आली. तर दुसऱ्या घटनेत सीएसटी स्थानकातून बसलेली महिला सोलापूर येथे अचानक गायब झाल्याची बाबही समोर आली आहे. या दोन्ही घटना गंभीर असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. 


राष्ट्रवादी महिला काँग्रेसने रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेबाबत वारंवार संघर्ष केला आहे. पण रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे प्रशासन ट्वीटरवर असल्याचा दावा केला जातो. बाळाला रेल्वेत दूध हवे असेल तर ते ट्वीटरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. पण या दोन्ही घटनांची माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिल्यानंतरही रेल्वे प्रशासनाला कोणतीही जाग आली नाही. तसेच सोलापूर येथे जी महिला गायब झाली त्या रेल्वे स्थानकात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते ही बाबही त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही पोलिस व्हेरीफीकेशन होणे गरजेचे आहे. त्यांचे पूर्ण रेकॉर्ड रेल्वे प्रशासनाकडे असणे गरजेचे आहे असेही त्यांनी या निवेदनातून प्रशासनाला सांगितले. या दोन्ही घटना गंभीर आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्या असतील. यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने पाऊले उचलावीत अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. या प्रकरणी उद्या चित्राताई वाघ मध्य रेल्वेच्या जीएमची भेट घेणार आहेत.   

संबंधित लेख