ठाणे विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरेंचा विजय निश्चित – मा. शरद पवार

30 May 2016 , 09:55:05 PM

ठाणे विधानपरिषद निवडणुकीसाठीचे आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांची ही पाचवी निवडणूक आहे. त्यांच्या याआधीच्या चार निवडणुकांचा अनुभव पाहता पाचव्या निवडणुकीतही ते विजयी होतील याबाबत मनात अजिबात शंका नाही, त्यांचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. वसंत डावखरे यांच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील प्रचारार्थ मा. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या व काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची सभा ठाण्यात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,  बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, माजी मंत्री गणेश नाईक, निरंजन डावखरे, ज्योती कलानी, पांडुरंग बरोरा, संदीप नाईक, राहुल नार्वेकर, किरण पावसकर, नरेंद्र पाटील, आप्पा शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, सुरेश तावरे, आनंद परांजपे तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या.

मतांची अडचण नाकारता येत नाही पण डावखरेंना ती अडचण कधीच जाणवलेली नाही. ते कमी-अधिक मतांनी का होईना नेहमीच निवडून आले आहे असे पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले. त्यामुळे डावखरेंनी आता त्यांचे नाव बदलले पाहीजे. कोणत्याही परिस्थितीत त्यांची बाजू ही उजवीच रहाते त्यामुळे डावखरे नाव बदलून उजवे खरे असे नाव ठेवायला काही हरकत नाही, अशी कोटी पवार यांनी केली. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी डावखरेंएवढा सक्षम उमेदवार असूच शकत नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी आतापर्यंत विधानपरिषदेत सक्षमपणे काम केले आहे याची जाणीव ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना आहे. डावखरेंचे सर्वांबरोबर असलेले स्नेहाचे संबध आणि त्यांचा दरारा पाहता मते कमी असली तरी फरक पडणार नाही, डावखरेंचा विजय हा निश्चित आहे, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी बोलताना पवारांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत की देशातले सर्व प्रश्न आता मिटले आहेत. जगात भारताची किंमत वाढली आहे आणि काँग्रेसमुक्त भारत करण्याचेही ते बोलत आहेत. त्यांना पुन्हा एकदा इतिहास तपासून पाहण्याची गरज आहे. गांधी-नेहरूंच्या विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. या देशाला मजबूत आणि एकसंध ठेवण्याचे काम गांधी-नेहरूंच्या विचारांमुळेच शक्य झाले आहे, असे पवार म्हणाले. यापूर्वीही काँग्रेसची सत्ता गेली पण त्यानंतर देशातील जनतेने पुन्हा काँग्रेसवर विश्वास दाखवला व काही वर्षातच पुन्हा एकदा काँग्रेसचे पुनरागमन झाले, याची आठवण त्यांनी करून दिली. केंद्र सरकारच्या दोन वर्षपूर्तीसाठी एक हजार कोटींची जाहिरातबाजी केली गेल्याची चर्चा आहे. सर्व स्तरावर यश मिळाल्याचे सांगण्यात येत असले तरी वस्तुस्थिती भिन्न आहे असेही ते म्हणाले. सामान्य माणसाच्या लक्षात आले आहे की परिवर्तनाची गरज आहे. ते आता फेरविचार करत आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन गांधी-नेहरू यांच्या विचारांच्या लोकांनी एकत्रित राहिले पाहीजे. सत्ता आणण्याची ताकद या विचारांत आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध रहा असे सांगत सर्व लोकप्रतिनिधींनी डावखरेंच्या मागे खंबीरपणे उभे रहा, सर्व शक्ती त्यांच्या मागे उभी करा, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

दरम्यान, ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी पाठींबा दिल्याने आता वसंत डावखरेंचे पारडे निश्चितच जड झाले असल्याचे तटकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावरही जोरदार टीका केली. कदम यांनी बेताल वक्तव्ये करू नयेत असेही ते म्हणाले. डावखरेंनी आपल्या कामाचा ठसा जनमानसात उमटवला आहे हे कदमांनी लक्षात घ्यावे असेही ते म्हणाले. ठाण्यात सेनेला भगदाड पाडण्याचे काम डावखरेंनी केले आहे. त्यांची प्रत्येक निवडणूक ही चुरशीची झाली आहे. पण तरीही त्यांनी आपलेच डाव खरे केले आहेत. त्यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते सर्वपक्षीय उमेदवार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. डावखरेंना चांगल्या मतांनी निवडून द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी लोकप्रतिनिधींना केले.

संबंधित लेख