मुस्लिम मुक्त भारताच्या वल्गना फोल ठरतील - खा. शरद पवार

22 Jun 2016 , 07:49:38 PM

सध्या भारत मुस्लिम मुक्त करण्याचा एक प्रवाह देशात सुरू आहे, अशी वक्तव्ये ऐकण्यात येत असतात. पण मुस्लिम मुक्त भारत हा विचार मला अमान्य आहे. जे कोणी मुस्लिम मुक्त भारत करू, असे बोलत असतील त्यांना खरेतर वेड्याच्या इस्पितळात पाठवावे लागेल. हा देश सर्वांचा आहे. सर्व धर्म, जातीचे लोक या देशात राहतात, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केले. औरंगाबादच्या एमजीएम मैदानात पवित्र रमझान महिन्यानिमित्त दावत-ए-इफ्तारचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अब्दुल कादीर मौलाना यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते नंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. फौजिया खान, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आमदार राजेश टोपे, अल्पसंख्याक विभागप्रमुख अब्दुल गफ्फार अब्दुल रज्जाक मलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार संजय वाकचौरे, ज्येष्ठ नेते मधुकर मुळे, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम व चिटणीस अंकुशराव कदम उपस्थित होते.


इफ्तारसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमझानचे पावित्र्य आणि मांगल्य सर्वांच्या आयुष्यात यावे, अशा सदिच्छा यावेळी पवार यांनी व्यक्त केल्या. दावत-ए-इफ्तारच्या या आनंद सोहळ्यास उपस्थित राहून मुस्लिम बांधवांशी संवाद साधता आला याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाजाची अवस्था ही दलित आणि आदिवासी समाजासारखी झाली असून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर काही विशेष अधिकारांसोबत सवलतीदेखील दिल्या पाहीजेत. त्याचबरोबर त्यांच्या मागे ताकदही उभी केली पाहीजे, मुस्लिमांना शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाची गरज आहे, असे पवार म्हणाले. मुस्लिम मुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजप खासदारावर त्यांनी जोरदार टीका करत खडेबोल सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसचा धर्मनिरपेक्षता हा कणा असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.


संबंधित लेख