पुरक पोषण आहार कंत्राटाची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा - नवाब मलिक

12 Jul 2016 , 06:33:12 PM

पुरक पोषण आहार कंत्राटाची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा - Nawab Malik 

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी.

महिला व बालकल्याण विभागाची पूरक पोषण आहाराची सहा हजार कोटींपेक्षा जास्त किमतीची कंत्राटे रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने आज दिले आहेत. राज्यसरकार ज्या निविदा काढते, त्यापैकी मोठ्या किंमतीच्या या निविदा होत्या. चिक्की प्रकरणातील अनेक अनियमितता याआधीही उघड झाल्या होत्या. निकृष्ट दर्जाचा चिक्कीपुरवठा तसेच बचत गटांना डावलून मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राटे दिल्याचे आरोप याआधी झालेले आहेत. आता पुन्हा औरंगाबाद खंडपीठाने पूरक पोषण आहाराच्या निविदा रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे या व्यवहारात गैरकारभार झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी, तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

केंद्र सरकारमार्फत पूरक पोषण आहार योजना राबविली जाते. राज्य सरकारला ही योजना महिला बचत गटांमार्फत राबवावी लागते. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ही योजना लोकांपर्यत पोहचवण्यात येते. या योजनेचे विकेंद्रिकरण करण्याच्या निर्देशाला बाजूला करत संपूर्ण प्रक्रिया राबवली गेल्याचा ठपका खंडपीठाने ठेवलेला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने नसावी, तर सर्वेक्षण करून त्या त्या भागातून निविदा मागवत विकेंद्रीय पद्धतीने करावी तसेच पूरक पोषण आहाराच्या कामाचे तालुकानिहाय सर्वेक्षण करून पुढील योग्य ती करवाई करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे याबाबत खंडपीठाने दिलेले आदेश पुरेसे बोलके आहेत, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख