पीक विमा भरण्याची मुदत वाढवून द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

26 Oct 2015 , 04:19:25 PM

खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची मुदत आज ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी अद्यापही पीक विमा भरलेला नसल्याने पीक विमा भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली.
पीक विम्याच्या प्रिमिअममध्ये झालेली वाढ कमी करावी आणि मुदत वाढवून मिळावी, यासाठीच दोन दिवसांपूर्वी मुंडे यांनी विधान परिषदेत हा विषय उपस्थित केला होता. आज त्यांनी पुन्हा हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याची दखल घेऊन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी आज निवेदन करताना याबाबत पीक विमा कंपन्या, राज्यशासनाचे प्रतिनिधी व केंद्रीय कृषिमंत्री यांच्यात या संदर्भात बैठक झाल्याचे सांगितले. विमा कंपन्या मुदत वाढवून देण्याबाबत सकारात्मक नाहीत. त्यामुळे आपण मुख्यंमत्र्यांना मध्यस्थी करण्यास सांगून केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यापूर्वीही विमा कंपन्यानी अनेक वेळा प्रिमिअम भरण्यासाठी मुदत वाढवून दिल्याचे दाखले मुंडे यांनी दिले. राज्यात दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने पेरण्या झालेल्या नाहीत. झालेल्या पेरण्यांवर पिकं आली नाहीत. शेतकऱ्यांकडे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. बँका पीक विमा भरण्यास सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे मुदत वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणून दिले.

संबंधित लेख