कोपर्डी प्रकरणातील आरोपींना ६ महिन्यांच्या आत मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या - अजित पवार

20 Jul 2016 , 06:57:10 PM

कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयासमोर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी राज्यात अनेक प्रकरणे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही बाब लक्षात घेता कोपर्डी प्रकरणाचा निकाल ६ महिन्यांच्या आत लावून गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. ६ महिन्यांच्या आत निकाल लागावा, यासाठी नवीन कायदा करावा लागला तरी सरकारने तो करावा. यासाठी आवश्यकता असल्यास केंद्र सरकारची मदत घ्यावी. आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. यात विरोधी पक्षदेखील सरकारला पूर्ण सहकार्य करतील, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
कोपर्डी मध्ये घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आणि शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. मात्र त्याचे या सरकारला काही पडलेले नाही. घटना घडल्यानंतर ३ दिवसांनी पालकमंत्री त्या ठिकाणी जातात. आपण त्या मतदार संघाचे काही तरी देणे लागतो हे लक्षात ठेवून तरी पालकमंत्र्यानी तेथे जाणे गरजेचे होते असेही पवार म्हणाले. कोपर्डी येथे झालेली घटना टाळता आली असती. या गावात अवैध दारू विकली जात होती. जे आरोपी पकडण्यात आले आहे ते दारूच्या नशेत होते. दारुच्या नशेमुळेच संध्याकाळी सात वाजता उजेड असताना हे क्रूर कृत्य करण्याचे धाडस केले. हे दारूचे अड्डे वेळेत बंद केले गेले असते तर हा प्रकार घडला नसता, असेही पवार म्हणाले. या गुन्ह्यात चार आरोपी आहेत. चौथ्या आरोपीस अजूनही अटक करण्यात आलेली नाही. १६ डिसेंबर २०१५ रोजी धनंजय सुद्रीक यांचा खून झाला होता. त्या खूनात हा आरोपी सहभागी होता. त्याच वेळी जर त्याला जेरबंद केले असते तरी ही घटना रोखता आली असती, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी या बाबत सोमवारी निवेदन केले त्याच्या साध्या प्रती अजूनही मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिस यंत्रणा नेमकी काय करत आहे हे समजले नाही. चौथ्या आरोपीचे काय झाले ते ही माहित नाहीत. गृहराज्यमंत्री कोपर्डीला गेले होते. त्यांचे तेथील लोक ऐकून घ्यायला तयार नाहीत. पालकमंत्र्यांना महिलांनी बोलू दिले नाही. हा उद्रेक का झाला याचा विचार सरकारने करावा. याला जबाबदार कोण? असा प्रश्नही पवार यांनी केला.
चांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांवर अत्याचार होत आहेत. मंत्रालयातील महिलाही सुरक्षित नाहीत. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. गणेश पांडेला अजूनही अटक झालेली नाही. गुन्हेगारांना जात, धर्म आणि पक्ष नसतो हे सरकारने लक्षात ठेवावे. त्यामुळे जे चुकीचे आहेत त्यांना शासन झाले पाहीजे त्यातून चांगला संदेश राज्यात जाईल. पण तसे सरकार करत नसल्याची टीका त्यांनी केली.
आज कोपर्डीमध्ये दहशत आहे. मुली शाळेत जात नाहीत. महिला शेतावर जाण्यास घाबरत आहेत. राज्यात जनतेमध्ये असंतोष आहे. त्यांचा उद्रेक होत आहे. लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्यांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. राज्यात अस्वस्था आहे. आरोपींना भर चौकात फाशी देण्याची मागणी होत आहे. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लोकांना विश्वास आणि आधार वाटला पाहीजे असे उत्तर द्या. प्राण्यालाही लाज वाटेल अशा पद्धतीने या मुलीचे लचके तोडले आहेत. त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहीजे. कायदा कडक करा जेणे करून बलात्कार करण्याचा धाडस कोणाच्यात होणार नाही. पीडितांना मदत दिली जाते पण त्या मदतीतून गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे भविष्यात अशी मदत देण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असेही पवार यावेळी म्हणाले.

संबंधित लेख