कोपर्डी प्रकरणाचा निकाल चार महिन्यात लावून आरोपींना भररस्त्यात फाशी द्या - धनंजय मुंडे

20 Jul 2016 , 07:08:07 PM

कोपर्डी प्रकरणातील चारही आरोपींवरील खटल्याचा निकाल चार महिन्यात लावून त्यांना भररस्त्यात फासावर लटकवा, अन्यथा सरकारला बाजूला सारुन माता-भगिनी, मुली-बाळींच्या रक्षाणसाठी जनताच कायदा हातात घेईल, असा खणखणीत इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात दिला.
विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून कोपर्डीतील अमानवी, घृणास्पद घटनेवर चर्चा उपस्थित करताना मुंडे यांनी सरकारच्या संवेदनशून्य व निष्क्रिय कारभारावर जोरदार हल्ला चढवला. कोपर्डीतील घटना अत्यंत गंभीर व शरमेने मान खाली घालावी अशीच आहे, परंतु सरकारला ती गांभीर्याने घ्यावीशी वाटली नाही, हे या राज्याचे दुर्दैव आहे, असे मुंडे म्हणाले. १३ जुलैला ही घटना घडल्यानंतर तक्रार नोंदवून घेण्यास दोन दिवसांचा उशीर का झाला? तक्रार नोंदवण्यास गेलेल्या मुलीच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली व तक्रार केल्यास तुम्हीच अडचणीत याल, अशी धमकी पोलिसांनी का दिली? याचीही चौकशी झाली पाहिजे व तत्पूर्वी दोषी पोलिसांना निलंबित करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
बलात्कारप्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केल्याचा दावा सरकार करत असले, तरी तो खोटा आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, ही वस्तुस्थिती आहे. पिडीत मुलीच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी संयम बाळगल्यामुळेच या घटनेचा स्फोट होऊ शकला नाही, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, असे मुंडे म्हणाले. या गुन्ह्यातील आरोपींनी यापूर्वी एक खून करुन पोलिसांच्या मदतीने तो पचवला, त्याचवेळी पोलिसांनी योग्य भूमिका घेतली असती व आरोपींना शिक्षा झाली असती, तर कदाचित ही घटना टळली असती, असेही मुंडे म्हणाले.
बलात्काराची घटना घडल्यानंतर तीन दिवस मुख्यमंत्र्यांनी तीची दखलच घेतली नाही. याकाळात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन स्नेहभोजन घेतले, परंतु पीडित कुटुंबियांची भेट घ्यावी, असे त्यांना वाटले नाही. त्यांच्या सहकारी मंत्र्यांचा आरोपीसोबतचा कथित फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर खुलासा करण्यासाठी मुख्यमंत्री अवघ्या तासाभरात माध्यमांसमोर हजर झाले. ही संवेदना त्यांनी पीडित मुलीसंदर्भात दाखवली नाही, ही गोष्ट व्यथित करणारी आहे. सहकारी मंत्र्यांच्या बचावासाठी मुख्यमंत्र्यांनी खऱ्या आरोपीचा फोटो प्रसिद्ध करुन हा खटला कमकुवत केला आहे, असा आरोपही मुंडे यांनी केला.
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनीही पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यास तीन दिवस विलंब केला. कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याच्या आनंदात खऱ्या मुख्यमंत्र्यांचं ऐकावं की 'जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचं' ऐकावं हा प्रश्न पालकमंत्र्यांना पडल्यानं हा विलंब झाला असावा, अशी टीकाही मुंडे यांनी पालकमंत्र्यांवर केली.
मुख्यमंत्र्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या भाजप युवा मोर्चाचा मुंबई प्रदेशाध्यक्ष गणेश पांडे यांने दारु पिऊन स्वत:च्याच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या दालनातच त्यांच्या स्वीय सचिव सुनील माळी याच्याकडून शासकीय महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा प्रयत्न झाला. या दोन्ही घटनांबद्दल गुन्हे दाखल होऊनही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, याकडेही मुंडे यांनी लक्ष वेधून शासनाच्या भूमिकेबद्दलच शंका व्यक्त केली.
कोपर्डीच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर, गेल्या दीड वर्षात राज्यात वाढलेल्या महिलांवरील अत्याचार, बलात्कार व खुनांच्या घटनांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्हा नागपुरातील वाढलेल्या गुन्ह्यांची आकडेवारीही मुंडे यांनी सभागृहात सादर केली. मुंबई, पुण्यासह अनेक शहरे महिलांना असुरक्षित वाटत असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यस्थेबद्दल चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी आता केवळ जुजबी आश्वासने न देता, गुन्हेगारांना वचक बसेल व अशी कारवाई करण्यास भविष्यात कुणी धजावणार नाही, अशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही मुंडे यांनी सरकारकडे केली.

संबंधित लेख