उपाययोजना झाल्या नाहीत तर जेलभरो आंदोलन करणार - शरद पवार

26 Oct 2015 , 04:25:49 PM

उस्मानाबाद - आज संकाटाच्या काळी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण एकत्र आलो आहोत. गेल्या वर्षी अतिवृष्टी होती, दुष्काळ होता, त्यावेळी मी कृषीमंत्री होतो. दिल्लीत बसून काही कळत नाही त्यासाठी बांधावर गेलो. तुमच्या जिल्ह्यात येऊन तुम्हाला मदत केली. आताच्या सरकारला शेतकऱ्यांसाठी काही करण्याची इच्छा दिसत नाही पण शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असा इशारा श्री. शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
१४ ऑगस्टला आपण निवेदन दिले. १४ सप्टेंबर पर्यंत थांबूया. सरकार अजूनही असेच वागत राहिले तर नुसता मोर्चा काढून चालणार नाही. जर उपाययोजना झाल्या नाहीत तर राज्यभर जिथे दुष्काळी परिस्थिती आहे अशा जिल्ह्यांत जेलभरो आंदोलन करणार. जर छावण्या काढल्या नाहीत तर आम्ही जनावरं घेऊन जेलमध्ये जाऊ. आमची सोय तुम्हीच करायची असं सरकारला सांगायचं. असे शरद पवार म्हणाले.
कालच संसदेचं अधिवेशन संपलं, म्हणजे सर्वच संपलं. आम्ही रोज जाऊन बसायचो. पण सभागृह अर्ध्या तासाकरता मग एका तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब. आम्हाला तुमचे प्रश्न मांडायचे होते. पण देशाचं नेतृत्व संसदेमध्ये आलंच नाही. बहनो आणि भाईयो अशी सुरूवात करणारे बहीण भावांना विसरले. संसदीय कामकाज आणि नरेंद्र मोदी सरकार यांचा समाचार घेतांना पवार यांनी फटकारले.
शेतकरी बांधवानो, मी एक सांगतो आत्महत्या करायची नाही. आपण काय मेलेल्या आईचं दुध प्यायलेले नाही. अशी भावनिक सादही श्री शरद पवार यांनी घातली.

संबंधित लेख