अर्थसंकल्पाचे सर्व संकेत सरकारने पायदळी तुडवले – आ. भास्कर जाधव

26 Jul 2016 , 06:12:14 PM

विधानसभेत पुरवणी मागण्या सादर करत असताना मूळ अर्थसंकल्पापेक्षा प्रत्यक्षात ४.५९ टक्के जास्त मागण्या मांडल्या गेल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे अर्थसंकल्पाचे सर्व संकेत पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. सभागृहातील पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. 
 
 
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या स्थितीवरही जाधव यांनी प्रकाश टाकला. सध्या या चारही कृषी विद्यापीठांमधील तब्बल ४ हजार ४४९ पदे रिक्त आहेत. त्यावर कृषी विभागाने तातडीने पावले उचलून भरती करावी व निधी उपलब्ध करून द्यावा, असे जाधव म्हणाले.
 
सागरी सुरक्षेची चर्चा नेहमीच होते. हा महत्त्वाचा विषय आहे. सागरी सुरक्षेसाठी नव्याने गस्ती नौका खरेदी केल्या जाणार आहेत. मात्र सरकारकडे आधीच सागरी गस्ती नौका असून त्या धुळ खात पडल्या आहेत. त्यांचा वापर होत नाही. प्रशिक्षीत कर्मचारी नसल्यामुळे असे होत आहे. त्यामुळे या बंद असलेल्या गस्ती नौका कशा पद्धतीने वापरात येतील यादृष्टीने त्वरीत पाऊले उचलणे गरजेचे आहे, असे जाधव म्हणाले.
 
सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्राच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. पण आत्तापर्यंत अनेक गृहनिर्माण प्रकल्प राबवले गेले. पण ते यशस्वी झाले नाहीत हा आजपर्यंतचा अनुभव आहे. शिवशाही गृहनिर्माण प्रकल्प हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. याकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. नव्या नगरपंचायती तयार केल्या गेल्या असल्या तरी तिथे कर्मचारी नाहीत, सीईओ नाहीत, सहाय्यक अनुदान दिले जात नाही, डीसीआर नाही. अशातऱ्हेने शहरांचा विकास कसा होणार, असा प्रश्नही या चर्चेवेळी त्यांनी केला. सार्वजनिक आरोग्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. आरोग्य विभागासाठी सोयीसुविधांचा अभाव असून पर्यावरण विभागासाठी तर केवळ २० कोटींची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यभरातल्या नद्यांच्या शुद्धीकरणाबाबतचा प्रश्नही जाधव यांनी या चर्चेदरम्यान उपस्थित केला.  

संबंधित लेख