तरतुदी फक्त कागदोपत्री नकोत, त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी - राणा जगजितसिंह पाटील

26 Jul 2016 , 06:20:54 PM

राज्यांतर्गत विविध विभागांसाठी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून ज्या तरतुदी केल्या जातात त्या फक्त कागदोपत्री होत आहेत. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसून ती तातडीने झाली पाहीजे, अशी मागणी पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत केली. 
 
कृषी समृद्ध योजनेची घोषणा सरकारतर्फे केली गेली. ही योजना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा राबवण्यात येणार होती. त्यासाठी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात गेल्या एक वर्षामध्ये केवळ १० ते १२ कोटी रूपयेच मिळाले आहेत. त्यात ग्रामपंचायतींना या योजनेअंतर्गत फक्त एक लाख रुपये देण्यात आले. आताच्या पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी १० कोटी मागितले आहेत. प्रत्यक्षात या योजना फक्त कागदावर राहत असल्यामुळे सरकार गंभीर नाही असेच म्हणावे लागेल. त्यामुळे तरतूदी करा पण त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणीही करा, असे राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.
 
शेतकरी अपघात वीमा योजनेचा लाभ सातबारा धारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मिळाला पाहीजे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय ठिंबक सिंचन अभियानातील अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. या योजने अंतर्गत ९९ कोटी शेतकऱ्यांचे देणे आहे, ते तातडीने मिळावे असेही त्यांनी सांगितले. उस्मानाबादी शेळीच्या प्रकल्पांनाही भरीव मदतीची गरज आहे. त्यासाठीचे अनुदान वाढवावे. उस्मानाबाद येथील नाट्यगृहाचे काम अजूनही अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी, अशा मागण्याही राणा जगजितसिंह पाटील यांनी केल्या.
 
आरोग्य विभागात गोंधळ असून उस्मानाबाद येथील रुग्णालयाची वाईट स्थिती आहे. महिलांसाठीच्या रूग्णालयाची ६० रूग्णांची क्षमता असताना तिथे मात्र प्रत्यक्षात शंभरपेक्षा जास्त महिलांना दाखल गेले जाते. यातील काही महिला रूग्णांना जमिनीवर झोपवले जाते. रूग्णालयातील शौचालये बंद आहेत. महिलांना शौचासाठी बाहेर जावे लागते, एवढी गंभीर स्थिती आहे. या रूग्णालयाची स्थिती सुधारणे गरजेचे आहे. तसेच कळंब येथे उपरूग्णालय निर्माण करावे असेही त्यांनी सांगितले. शेतकरी आणि आरोग्य सेवेबाबत सरकारने गंभीर होऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राणा जगजितसिंह पाटील यांनी सभागृहात केली.

संबंधित लेख