मागेल त्याला शेततळे योजना राज्यात अयशस्वी - अजित पवार

29 Jul 2016 , 06:28:58 PM

मागेल त्याला शेततळे ही सरकारची योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. मागेल त्याला शेततळे ही योजना संथ गतीने सुरू असल्याबाबतच्या तारांकीत प्रश्नावरील चर्चेवेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी प्रत्यक्षात योजनेच्या अंमलबजावणीची सत्यता काय आहे हे सभागृहासमोर आणत रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांची कोंडी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५० हजारात शेततळे होते, असा दावा करत आहेत. ते कसे शक्य आहे हे एकदा मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान पवारांनी दिले. शेततळ्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकसाठी किती खर्च येतो हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यात तब्बल १ कोटी ३७ लाख शेतकरी आहेत. सरकारने जे उत्तर दिले आहे त्यात फक्त ३८ हजार ३९३ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती आहे. म्हणजेच एक टक्के शेतकऱ्यांनाही शेततळे मिळालेले नाही. हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे मागेल त्याला शेततळे ही योजनाच फेल ठरली आहे. सरकारकडे अजूनही वेळ आहे. ५० हजारात शेततळे होत नाही. त्यामुळे किमान १ लाख तरी अनुदान दिले पाहीजे अशी जोरदार मागणी यावेळी अजित पवार यांनी केली. यावर, अनुदान वाढवण्याचा सरकार नक्की प्रयत्न करेल असे उत्तर रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिले.

संबंधित लेख