पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ द्या - धनंजय मुंडे

29 Jul 2016 , 06:40:31 PM

खरीप २०१६ च्या हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ द्या, अशी आग्रही मागणी आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यातील ११ लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याबाबत तसेच बुलडाणा, औरंगाबाद सारख्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाल्याचा मुद्दा नियम ९३ अन्वये त्यांनी उपस्थित केला होता. याच अनुषंगाने बोलताना मुंडे म्हणाले की, पीक विमा भरण्याची मुदत दि. ३१ जुलै २०१६ पर्यंत आहे. मात्र उद्या असलेला बँक कर्मचाऱ्यांचा संप, शनिवार, रविवार रोजी शासकीय सुट्टी लक्षात घेता शेतकऱ्यांना पिकविमा भरण्यासाठी केवळ आजचा दिवस शिल्लक आहे. एकाच दिवसात राज्यातील सर्व शेतकरी पीक विमा भरू शकत नसल्याने लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे देशातील इतर सहा राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी ज्याप्रमाणे १५ दिवसांची मुदतवाढ दिली गेली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, असे मुंडे म्हणाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सदर प्रश्नाला उत्तर देताना याबाबत केंद्र सरकारशी बोलणे सुरू असून मुदतवाढ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.

गंगापुरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा अवमान प्रकरणी आरोपींना अटक करा
गंगापुर तालुक्यातील गंगापुर सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातील तलवार चोरून नेऊन अवमान करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत नियम २८९ अन्वये बोलताना केली.

छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारला छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करावी वाटत नाही, याबद्दल खेद व्यक्त करून सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची अद्याप पोलीसांनी दखल का घेतली नाही, साधा गुन्हाही का नोंदविला नाही, आरोपी अटकेत का नाहीत, असे प्रश्न उपस्थित करून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी मुंडेंनी केली. या गंभीर घटनेची दखल घेत सोमवारी याबाबत निवेदन करण्याचे आश्वासन सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिले.

संबंधित लेख