देशात सांप्रदायिक विचार वाढणे ही चिंताजनक बाब - खा. शरद पवार

23 Aug 2016 , 09:02:17 PM

'गायीला आई न म्हणणाऱ्यांनी देश सोडून जावे', असे विधान देशातील एका माननीय मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला मिळाले. देशात असे सांप्रदायिक विचार वाढणे, ही चिंतेची बाब आहे. गायीचा आदर आम्ही सर्वच जण करतो. पण आईच्या जागी गायीला माता म्हणण्याचा आदेश देण्याचे अधिकार यांना कोणी दिले? देश यांच्या मालकीचा आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांनी केला आहे. पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, खासदार शरद यादव, डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार यांनी, स्वातंत्र्यवीर सावकर हे विज्ञानाचा पुरस्कार करणारे होते. सावरकरांनी गाय ही उपयुक्त पशू आहे, असे लिहिले आहे. त्यांनी बांधलेल्या मंदिरात दलित व्यक्तीची पुजारी म्हणून नियुक्ती केली होती. सावरकरांची ही भूमिका न सांगता त्यांना हिंदुत्ववादी म्हणून पुढे केले जात आहे, अशा शब्दात सांप्रदायिक विचारांचा प्रचार करत असलेल्या लोकांवर सडकून टिका केली. जमातवादाचे आव्हान फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नसून धर्मासाठी कायदा हातात घेऊन जगभरात हत्या केल्या जात आहेत. गाईला आई म्हणण्याची सक्ती करणे, ही चिंताजनक परिस्थिती आहे. देशात जमातवादाचा पगडा प्रस्थापित होण्याचे हे संकेत असल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पुण्यभूषण फाऊंडेशन (त्रिदल, पुणे) यांच्यावतीने ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री डॉ. भाई वैद्य यांना ज्येष्ठ समाजवादी नेते, खासदार शरद यादव यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद खा. शरद पवार यांनी भूषवले. पवार यांनी भाई वैद्य यांच्यासमवेतच्या कामाला उजाळा देत अखंड कार्यरत राहण्याच्या त्यांच्या गुणाचे कौतुक केले . अनेक दिग्गजांबरोबर काम करण्याचा आनंद भाई वैद्य यांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, साम्यवादाबद्दल आपले विचार मांडताना पवार म्हणाले की, "साम्यवाद हा विचार म्हणून चांगला असला तरी व्यावहारिकतेत, धोरणात्मक वास्तवात समाजात संपत्ती निर्मितीची वाढ होणे गरजेचे असते, हे समाजवादी चौकटीतील मंडळीना पटत नाही . पुण्याच्या परिसरात झालेल्या औद्योगिक विकासाने हजारोंना रोजगार मिळाले, हे या संदर्भात लक्षात ठेवले पाहिजे. मात्र येणाऱ्या गुंतवणुकीला, औद्योगिकीकरणाला मानवी चेहरा दिला की चिंता करण्याचे कारण राहणार नाही."

संबंधित लेख