कांद्याच्या हमीभावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमध्ये कांदा फेको आंदोलन

24 Aug 2016 , 09:24:49 PM

सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तालुकावार तहसीलदार कार्यालयांवर अभिनव असे 'कांदा फेको आंदोलन' करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा ५ पैसे किलो इतक्या कवडीमोल भावाने विकला जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून  शेतकरी प्रचंड हतबल झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. दि. १ जानेवारी २०१६ पासून नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. 

बेशुद्ध झालेल्या माणसाला जर कांदा फोडून सुंगवला तर त्या कांद्यामुळे तो माणूस शुद्धीवर येतो. त्याचप्रमाणे केंद्र व राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार शुद्धीवर नसल्याने, आज तहसीलदार कार्यालयांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कांदा फेकला असून सरकार तो कांदा हुंगून तरी शुद्धीवर येईल आणि कांद्याला किमान २.५ हजार रुपये हमी भाव जाहीर करेल अशी अपेक्षा यावेळी बोलताना रविंद्र पगार यांनी केली. कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. यापूर्वी देखील या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात तालुकावार रास्ता रोको व अन्य आंदोलने करण्यात आली होती. परंतु गेंड्यांची कातडी पांघरलेल्या सरकारला जाग येत नसून शेतकऱ्यांची कीव सुद्धा येत नसल्याने सरकार कांद्याबाबत काहीही निर्णय घेत नाही. शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण असल्याची टीका जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांनी यावेळी केली.

संबंधित लेख