गणेश चतुर्थीपूर्वी अनुदानास पात्र ठरलेल्या शिक्षकांचे वेतन सुरू करा

25 Aug 2016 , 06:47:24 PM

राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या सर्व शाळांमधील व वर्ग-तुकड्यांवरील शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन श्रीगणेशाच्या आगमन मुहूर्तावर सुरु करा, तसेच चालू वर्षात विद्यार्थी संख्येवर आधारित संच मान्यता केल्यानंतरच समायोजनाची प्रक्रिया राबवा, अशा दोन मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या. या दोन्ही विषयांच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. दोन्ही मागण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी शिक्षण विभागाला सूचना देण्यात येतील, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे, आ. दत्तात्रय सावंत, आ. श्रीकांत देशपांडे आणि आ. सतीश चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडला.

अनुदानास पात्र ठरलेल्या सर्व शाळा व वर्ग-तुकड्यांवरील शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरु करु, असे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात दिले होते. यावर कार्यवाही सुरू होण्यासाठी शासनाने आदेश काढलेले नाहीत, त्यामुळे ते लवकरात लवकर काढावेत, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.

दरवर्षी ३० ऑगस्टच्या पटसंख्येवर आधारित संचमान्यता करण्यात येते. सध्या ऑगस्ट अखेर होत असतानाही २०१५-१६ च्या संचमान्यतेत अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. इंग्रजी शाळेतून मराठी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असल्याचेही, शिक्षण मंत्र्यांनी याच अधिवेशनात शिक्षणासंबंधी चर्चेदरम्यान सांगितले होते.

यावेळी विद्यार्थी संख्या व वर्गखोल्या उपलब्ध असूनही शिक्षक अतिरिक्त दाखविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे चालू वर्षाची संचमान्यता करूनच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही करावी, तसेच सध्याची प्रक्रिया त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली. या दोन्ही मागण्यासंबंधी कार्यवाही करण्याबाबतचे आदेश शिक्षण विभागाला देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.

संबंधित लेख