युवा कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण हवी- शरद पवार

26 Oct 2015 , 04:28:47 PM

नागपूर- विदर्भ दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरला भेट दिली. येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विदर्भ युवा संवाद या कार्यक्रमात त्यांनी युवकांशी संवाद साधला. शेतकऱ्यांशी निगडीत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी यावेळी युवा कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 
दुष्काळ व शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सध्या राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न आहेत. युवा कार्यकर्त्यांना अशा प्रश्नांची जाण असायला हवी, असे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आदरणीय शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांना आधार द्या, मदत मिळवून द्या व त्यासाठी प्रसंगी संघर्षही करा, असे आवाहनही पवार यांनी केले. तसेच, विविध राजकीय पक्षांची विचारसरणी समजून घ्या आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम व्हा, असा कानमंत्रही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
सामाजिक प्रश्नांबाबत बोलताना पवार म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कुणीही गंभीर नाही. आरक्षणाची समीक्षा म्हणजे मुठभर लोकांचे हित आणि उपेक्षितांचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न आहे. समाजातील दुर्बल घटकांचे हित जपायलाच हवे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. प्रफुल पटेल, माजी मंत्री आणि नागपूर शहराध्यक्ष अनिल देशमुख, युवक उपाध्यक्ष सलील देशमुख, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष रमेश बंग, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे हे ही उपस्थित होते.

संबंधित लेख