राज्यातील सरकार शेतकरी विरोधी-सुनील तटकरे

29 Aug 2016 , 06:35:15 PM

राज्यातील भाजप व फरफटत जाणारी शिवसेना यांचे युती सरकार हे शेतकरी विरोधी असून सत्तेत आल्यापासून सरकारकडून शेतकरी वर्गासाठी कोणताही दिलासादायक निर्णय निर्णय होत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी केली. नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, माजी मंत्री ए.टी.पवार, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, आमदार पंकज भुजबळ, आमदार दिपीका चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार शांताराम आहेर, माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार दिलीप बनकर, जेष्ठ नेते अॅड.भगिरथ शिंदे, शिवदास डागा, शिवाजी चुंभळे, अर्जुन टिळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडकून टीका केली. नाशिक शहरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र नुकसानीचे आजतागायत पंचनामे केले गेले नसून त्यांना कुठलीही मदत उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. कांद्याला ५ पैसे प्रति किलो इतका कवडीमोल भाव मिळाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आक्रमकपणे सातत्याने रास्ता रोको, कांदा फेको यांसारखी आंदोलने करीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सातत्याने प्रयत्न करत आहे. यापुढेही विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. राज्य सरकारकडून वेळ गेल्यानंतर शेतकऱ्याला १ रुपया प्रति किलो अनुदान व निर्यातीवर ५ टक्के सुट देण्याचा प्रयत्न होतोय. पण हे अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. २५ वर्षांपूर्वी आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना १०० रुपये अनुदान दिले होते. आज २५ वर्षांनंतर सरकार कडून इतके कमी अनुदान मिळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. नाफेडकडून कांदा खरेदी म्हणजे तर केवळ अकलेचे कांदे तोडण्यात येत असल्याची टीका तटकरे यांनी केली. शेतकऱ्यांना वाजवी दराप्रमाणे हमीभाव व अनुदान मिळायलाच हवे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

गेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला अपयश आल्याने हे झाकण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये बद्दल करत प्रभाग रचना व जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड हा सरकारचा डाव असल्याची टीका तटकरेंनी केली. सरकारमध्ये भाजप- शिवसेना आपापसात भांडून जनतेची दिशाभूल करत आहे. शिवसेना सत्तेत असताना देखील विरोधकाची भूमिका बजावताना दिसते आहे. युती सरकारमधील दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, असेही ते पुढे म्हणाले. पण ही म्हणजे जनतेची दिशाभूल असून याचे चोख उत्तर जनता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास व्यक्त करत या निवडणुकांमध्ये पक्ष सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांना देखील त्यांचा मार्ग खुला असून ज्यांना जायचे असेल त्यांनी उद्या जाण्याऐवजी आजच जावे. पक्षाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या नेते कार्यकर्त्यांना पक्षात थारा नाही, असा इशारा त्यांनी दिला.

 

 

संबंधित लेख