स्व.यशवंतराव चव्हाण यांचे कार्य देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे-शरद पवार

29 Aug 2016 , 06:44:12 PM

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे आहे, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री ते उपपंतप्रधान या पदावर असताना केलेले काम उल्लेखनीय आहे, चव्हाण साहेबांच्या विविध गुणांचा, वाचन प्रियतेचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन युवकांनी काम करावे, असे प्रेरणादायी वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद इथे केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र, औरंगाबादचा दशकपूर्ती सोहळा मोठया दिमाखात साजरा झाला. या सोहळ्याप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात समाजाच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या दहा ज्येष्ठ तज्ञ मान्यवरांचा मानपत्र, शाल, यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या ज्येष्ठ सत्कारमूर्तींमध्ये पद्मश्री फातेमा झकेरिया, माधवराव चितळे, डॉ.गंगाधर पानतावणे, डॉ.आर.बी. भागवत, त्र्यंबक महाजन, प्रा. दिनकर बोरीकर, नागनाथ फटाले, विजयअण्णा बोराडे, डॉ.दुलारी कुरेशी, डॉ.द्वारकादास लोहिया यांचा समावेश होता.

औरंगाबाद विभागीय केंद्राच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने चव्हाण साहेबांच्या कार्याला पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न औरंगाबाद विभागीय केंद्राने पूर्णपणे केला आहे. या केंद्राची तरुण फळी निश्चितच चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शक तत्वांवर चालत कार्य तडीस नेत असल्याचे पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले. ज्या दहा ज्येष्ठांचा सन्मान या केंद्राच्या वतीने होत आहे ही सगळी मंडळी आजच्या तरुणांसमोर निश्चितच आदर्श उभी करणारी आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी औरंगाबाद विभागीय केंद्राच्या वतीने गेल्या दहा वर्षाच्या कार्याचा आढावा घेणारी स्फूर्तिदायी ही पुस्तिका पवारांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.

संबंधित लेख