जीएसटीमुळे महागाई वाढणार – अजित पवार

30 Aug 2016 , 05:19:57 PM

देशात येऊ घातलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थातच जीएसटी कायद्यामुळे करप्रणाली सुरळीत होईल, मात्र सामान करप्रणाली लागू झाल्याने देशातील गरीब जनतेलाही अप्रत्यक्षपणे कर द्यावा लागणार असून यातून महागाई वाढण्याची भीती असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज भरविण्यात आले. यावेळी विधानसभेत झालेल्या चर्चेत पवार बोलत होते. जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत राज्यांना निधी कमी पडल्यास केंद्र सरकार राज्यांना अतिरिक्त दोन टक्के जीएसटी वसूल करण्याची परवानगी देणार आहे. पण हा दोन टक्के कर राज्यातल्या गरीब जनतेकडूनच घेण्यात येणार असल्याने ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडून महागाई वाढण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दहा वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दहा वर्षांनंतर आता हे विधेयक मंजूर होत आहे. याला जबाबदार कोण आहे, असा सवाल पवारांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला होता. तर आता हेच विधेयक आर्थिक सुधारणा करणार असल्याचे ते म्हणत आहेत. अशी भूमिका बदलत राहून राजकारण करणे जनतेच्या हिताचे नाही. आर्थिक आणि सामाजिक सुधारणा होत असलेल्या कामात भाजपने राजकारण करू नये, असा टोला पवार यांनी लगावला.

आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य आणि कमकुवत राज्य असा कोणताही भेद या करप्रणालीत नसल्यामुळे त्याचा काही अंशी फटका तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रालाही बसेल. मोठ्या शहरातल्या जकाती बंद होणार असल्याने केंद्र सरकार याचा किती आणि कसा परतावा देणार आहे, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे, अन्यथा भविष्यात महानगरपालिकांची आर्थिक घडी बिघडेल, असेही ते म्हणाले. सध्या भाजपच्या राज्यात नगरपालिकांना निधी देण्याच्या कार्यात ही हेतुपुरस्सर भेदभाव केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला लाभ मिळावा या दृष्टीने सार्वजनिक खात्यामार्फत निधीचे वाटप केले जात आहे. अशा पद्धतीने नगरपालिकेच्या आर्थिक घडीला तडा दिला जात असून हेच धोरण जीएसटी मध्ये राबवल्यास हा कायदा आपला परिणाम साधणार नाही. त्यामुळे याचा विचार कायद्यात होणे गरजेचे असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख