उत्तम प्रशासनासाठी आगामी मनपा निवडणुकांमध्ये घड्याळाचे बटन दाबा

01 Sep 2016 , 07:14:43 PM

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाणे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना पक्षसंघटन तसेच निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मनपा सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ ठाणे शहराध्यक्ष आनंद  परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, आमदार जगन्नाथ शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे महिला अध्यक्षा करिना दयलानी, निरीक्षक अशोक पराडकर, ठाणे मनपा विरोधी पक्षनेते संजय भोईर, युवक जिल्हाध्यक्ष मंदार केणी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अभिजीत पवार, युवती अध्यक्ष प्रियांका सोनार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकांची स्वप्ने विकत घेण्याचा प्रयत्न झाला. ट्विटरवर फक्त टिवटिव झाली पण प्रत्यक्षात कामे काही झालेली नाहीत. यासाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती व जिल्हापरिषद निवडणुकांसाठी, राज्यभर मेळावे घेऊन याबद्दल जनतेमध्ये जागृती करणार आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई मनपातील उत्तम कारभार आणि शिवसेनेच्या अखत्यारीतील मुंबई, ठाणे मनपाचा भ्रष्टाचार जनतेसमोर ठेवण्याचे काम या मेळाव्यांच्या माध्यमातून करणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस मनपामध्ये सत्तेत असलेली नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड ही शहरे खूप विकसित झाली आहेत. याउलट शिवसेनेची मुंबई, ठाण्याच्या मनपात सत्ता आहे. पण आज या शहरांची काय परिस्थिती आहे? हे जनता जाणते, असा टोला विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. मुंबई, ठाण्यात २०-२५ वर्षे सेनेची सत्ता आहे. एवढ्या काळात शहरांना जागतिक ओळख मिळायला पाहिजे होती, पण तसे झालेले नाही. मुंबई वगळता इतर मनपांचा ४ उमेदवारांचा वार्ड केला आहे. मुंबईसारखा एक उमेदवारांचा वॉर्ड असता तर बरे झाले असते. पण हम करे सो कायदा, अशी भूमिका ठेवल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. जनतेच्या मनात असेल तर ते काहीही करू शकतात, हे पालकमंत्र्यांच्या वॉर्डात अपक्ष उमेदवाराने पोटनिवडणूक जिंकून सिद्ध केले आहे, असेही पवार म्हणाले. ठाणे शहराला पाणी कपातीपासून मुक्त होऊन रोज पाणी हवे असेल तर त्यांनी आगामी मनपा निवडणुकांमध्ये घड्याळाचे बटन दाबावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तसेच, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आभार मानत आनंद परांजपे यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ नेते वसंत डावखरे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणी सुरू केली असून मिशन ठाणे मनपा २०१७, हे अभियान हाती घेऊन आगामी मनपा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले.

संबंधित लेख