मुख्यमंत्र्यांना कायद्याचे राज्य चालू द्यायचे नाही – नवाब मलिक

12 Sep 2016 , 06:25:01 PM

राज्यातील पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत भाजपचेच नेते व कार्यकर्ते पोलिसांवर हल्ला करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. आज राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला होता. जालना जिल्ह्यातील भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या अरेरावीला कंटाळून बदलापूरचे पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व तसा एसएमएस पोलीस अधीक्षकांना पाठविल्याची घटना मागील महिन्यात घडली. तसेच जळगावचे पोलीस अधिकारी अशोक सदरे यांच्या आत्महत्येप्रकरणीही राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे निवटवर्तीय जबाबदार असल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केला. त्यामुळे राज्यातील पोलिसांमध्येच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून हे भयावह चित्र बदलायचे असेल तर राज्यात कायद्याचे राज्य निर्माण व्हावे, अशी भावना नवाब मलिक यांनी व्यक्त केली. तसेच पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करू नका व पोलिसांवर राजकीय दबाव आणू नका तेव्हाच सद्यपरिस्थिती बदलेल, असे मत मलिक यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख