राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऑलिम्पिकवीरांचा सन्मान

15 Sep 2016 , 05:50:25 PM

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'रिओ ऑलिम्पिक २०१६' मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या क्रीडापटूंचा एमसीए क्लब, मुंबई येथे आज सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलतटकरे विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेचे माजी उपसभापती व पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष वसंत डावखरे, भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, आ. किरण पावसकर, युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव, पार्थ पवार आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते धावपटू कविता राऊत, रोईंगपटू दत्तू भोकनाळ, धावपटू ललिता बाबर यांची बहिण जयश्री बाबर, टेनिस खेळाडू प्रार्थना ठोंबरे हिचा भाऊ दिपक अंबारे, हॉकीपटू देवेंद्र वाल्मिकी यांच्या आई-वडिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुंबईतील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, खेळाडू या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कविता राऊत आणि दत्तू भोकनाळ यांनी यानिमित्ताने उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय हॉकी संघाचे खेळाडू युवराज वाल्मिकी यांच्या घरी अनेक वर्षांपासून वीज नव्हती. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांची भेट घेऊन वीजेची व्यवस्था करण्याची मागणी वाल्मिकी यांनी त्यांच्याकडे केली होती. मागणी केल्यानंतर तीन तासांच्या आत युवराजच्या घरी वीजेची व्यवस्था दादांनी केली होती, अशी आठवण भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांनी आपल्या मनोगतात सांगितली. राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांनी क्रीडा क्षेत्रातील अनेक संस्थांवर अध्यक्षपद भूषविले आणि देशात खेळांचा विकास केला. त्यामुळे पूर्वीपासूनच राष्ट्रवादीची नाळ खेळांशी जोडलेली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी म्हणाले. या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला दोन पदके मिळाली, याचा आनंद व्यक्त करतानाच लोकसंख्येच्या तुलनेत दोन पदके कमी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यासाठी क्रीडा क्षेत्रात अधिक सुविधा व खेळाडूंना अधिक संधी भविष्यात उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली. २०२०च्या टोकियो (जपान) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आणखी पदके मिळतील आणि ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रातील खेळाडूंची संख्या वाढेल अशी आशा व्यक्त करत सुनील तटकरे यांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील कारकर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख