निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला गळती, लातूरमधील सेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

15 Sep 2016 , 05:54:59 PM

सत्ता मिळाल्यानंतर पक्षात मानसन्मान मिळत नसल्याने लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख दिलीप सोनकांबळे, माजी शहरप्रमुख किसन समुद्रे आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि प्रदेश सरचिटणीस उमेश पाटीलदेखील यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहराध्यक्ष मकरंद सावे व कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या पुढाकाराने लातूरमधील सेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला.

पक्षात नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना अजित पवार म्हणाले की, शिवसेना मुंबईत फोफावली पण शिवसेनेने ग्रामीण भागाकडे लक्ष दिले नाही. लातूरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असताना शिवसेना येथे वाढवण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले, पण सत्ता मिळाल्यानंतर सामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला नाही. शिवसेनेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महत्त्व दिले जात नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापेक्षा वेगळा अनुभव कार्यकर्त्यांना येईल असे, पवार म्हणाले. राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय नेत्यांना तुम्ही कधीही भेटू शकता आणि आपली व्यथा मांडू शकता असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तरी हे सरकार ठोस पाऊले उचलत नाही. जनतेची कामे करायचे सोडून सेना-भाजप एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न आहेत. ज्या शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली, शिवसेनेला मोठे केले, त्या शिवसेनाप्रमुखांचे साधे स्मारक अद्याप शिवसेनेला बांधता आले नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. तसेच येत्या काळात राष्ट्रवादी पक्षाला मराठवाड्यात मेळावे घ्यायचे आहेत. तेव्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याच्या कामाला वेग द्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. शिवसेनेचा ढाचा बदलत असून शिवसेनेचे नेतृत्वच पक्षाला बदलत असल्याचा आरोप यावेळी तटकरे यांनी केला. कार्यक्रमाची सांगता करताना पक्षात नवीन आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानत तटकरे यांनी त्यांना जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

 

संबंधित लेख