वैद्यकीय शाखेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतली खा.शरद पवार यांची भेट

16 Sep 2016 , 05:33:07 PM

महाराष्ट्रातील खासगी तसेच विद्यापीठ मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राज्यातील १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत ८५ टक्के जागा राखीव ठेवल्या जाव्यात, या मागणीसह वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे व आ. डॉ. समीर दलवाई यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
महाराष्ट्राने कायमच उत्तम वैद्यकीय शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. खासगी व विद्यापीठ मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांना राज्य शासनातर्फे अनेक पातळीवर सूट व सवलती दिल्या जातात. त्यामुळे इथल्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देणे हे या महाविद्यालयांचे कर्तव्य आहे. जेणेकरून भविष्यात हे विद्यार्थी राज्यातील लोकांची सेवा करतील. म्हणूनच एकूण जागांपैकी ८५ टक्के किंवा त्याहून अधिक जागा एनईईटीच्या गुणवत्ता यादीप्रमाणे गुणवत्ताप्राप्त स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचे प्रयत्न करण्यासाठी पवारसाहेबांचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
खा. शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार खासगी तसेच विद्यापीठ मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांना याबाबतीत आवाहन करण्यात येणार असल्याचे डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले.

संबंधित लेख