कुपोषणामुळे बालकांचा जीव जाणे ही राज्यासाठी शरमेची बाब –धनंजय मुंडे

19 Sep 2016 , 05:46:56 PM

मोखाडा येथील कुपोषित मुलांच्या मृत्यूस आरोग्य, महिला व बाल कल्याण आणि आदिवासी विकास विभाग जबाबदार असल्याची टीका करत मुख्यमंत्र्यांनी या तिन्ही विभागाच्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मुंडे यांनी आज कुपोषणग्रस्त पालघर जिल्ह्याचा दौरा केला, यावेळी ते बोलत होते. या दौऱ्यात त्यांनी खर्डी आणि वाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व तेथील कुपोषीत बालके व त्यांच्या मातांची विचारपूस केली. तसेच कुपोषणामुळे दगावलेल्या सागर वाघ व ईश्वर सावरा या दोन्ही बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, शहापूरचे आ.पांडुरंग बरोरा, आनंद ठाकूर उपस्थित होते.

दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना, आदिवासी बालके, गरोदर स्त्रिया,स्तनदा मातांना सकस आहार,आरोग्य सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे पालघर जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण भयावह असून बालकांचे नाहक बळी जात आहेत, अशी खंत मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. आदिवासी मंत्र्यांच्याच मतदारसंघात कुपोषणाचे रुग्ण जास्त असल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी यावेळी दिली. या सरकारमधील मंत्र्यांचे आतापर्यंत अनेक घोटाळे बाहेर काढले; पण मुख्यमंत्र्यांनी सर्वांना क्लीन चीट दिली, त्यामुळे मुख्यमंत्री घोटाळेबाजांना पाठिशी घालतात की पाठबळ देतात असा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या काळातील योजनांमुळे कुपोषणाचे प्रमाण खूपच कमी होते, मात्र सध्याच्या सरकारने ती योजना बंद पाडली, असा आरोप मुंडे यांनी केला. आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, हे सरकार बेजबाबदार आहे, सत्ता आल्यानंतर मंत्र्यांना मस्ती आली आहे अशी टीका त्यांनी केली. कुपोषणामुळे बालकांचा जीव जाणे ही राज्यासाठी शरमेची बाब आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी मुंडे यांनी केली.

संबंधित लेख