सरकार नुसती चर्चा किती दिवस करणार? आता थेट निर्णय घेण्याची वेळ आली आहे –शरद पवार

19 Sep 2016 , 05:51:18 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी 'एबीपी माझा' वृत्त वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत मराठा आरक्षणासाठी निघणारे उत्स्फुर्त मोर्चे, त्यामागची कारणे आणि सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता यावर सविस्तर भाष्य केले. मराठा समाज मोर्चा हा कुठल्याही राजकीय नेतृत्वाशिवाय पुढे येतोय, हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात असल्याचे कुठलेही चित्र दिसत नाही, हा एक शिस्तबद्ध मूक मोर्चा असूनही त्यांचे प्रश्न गांर्भीयाने हाताळले जात नसल्याचे शरद पवार यांनी या मुलाखतीत सांगितले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सुशिक्षित तरूणांना काम करण्याची समान संधी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा आणि अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, या मागण्यांसाठी तरूण वर्ग रस्त्यावर उतरला आहे. या मोर्चाचे नेतृत्व हे तरूणांकडे आहे, त्यामुळे सत्तेबाहेर असलेल्यांचा हा उद्रेक आहे, असा आरोप होणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांच्या प्रश्नांबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं सामंजस्याने पुढाकार घ्यायला हवा. सामाजिक वातावरण संयमाचे राहावे यासाठी समाजाचे प्रतिनिधित्व करणा-यांनी संयम ठेवायला हवा. आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार दिले असताना त्यांची चिकित्सा करून हा गंभीर प्रश्न संवेदनशीलतेने हाताळायला हवा. सर्व राजकीय नेत्यांनी या निर्णयामध्ये सहमती दाखवलेली असली, तरी ती सहमती कृतीत येणं गरजेच असल्याची भावना पवार यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केली.
सरकारच्या शेतकरी धोरणावर भाष्य करताना, आजही सत्ताधाऱ्यांची शेती आणि शेतकऱ्यांविषयीची भूमिका काय आहे, ती स्पष्ट होत नाही. आधीच्या सरकारनं शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन, त्या दृष्टीने मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न केला. त्यामुळे फक्त चर्चा किती दिवस करायची? आता थेट निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अशी सूचनाही पवार यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या 'सत्ता उपभोगण्याबात' केलेल्या वक्तव्यांवरही त्यांनी टीका केली. सत्ता ही लोकशाही मार्गाने मिळते. आपण १५ वेळा निवडून आलो, लोक एक वेळ चूक करतील पण १५ वेळा करणार नाहीत, त्यामुळे ज्याअर्थी लोकांनी मला १५ वेळा निवडून आणले आहे त्याअर्थी त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, असे सांगत पवार यांनी लोकांचा पाठिंबा आणि विश्वास सोबत असणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.

संबंधित लेख