केडर कॅम्पच्या माध्यमातून युवकांची सक्षम फळी निर्माण होईल – धनंजय मुंडे

20 Sep 2016 , 06:10:49 PM

राष्ट्रवादी युवक काँग्रेस केडर कॅम्पच्या माध्यमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या विचारांची युवकांची पुढील २५ वर्षांतील फळी निर्माण होईल अशा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ते नाशिक येथे आयोजित केडर कॅम्पमध्ये बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस, धनंजय मुंडे यांनी काश्मिरमधील उरी येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवकांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे विचार युवकांसमोर ठेऊन भविष्यात तरुणांची सक्षम फळी निर्माण करण्यासाठी केडर कॅम्पसारख्या शिबिरांचे राज्यात आयोजन करण्यात येत आहे. या संधीचा युवकांनी फायदा घ्यावा असे आवाहन करत पुढील काळात युवकांची सक्षम फळी असलेला राष्ट्रवादी हा मोठा पक्ष असणार असून सत्तेपासून पक्षाला कोणीही दूर ठेवू शकत नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यापुढील काळात पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी युवकांवर असून पक्षसंघटनेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मुंडे म्हणाले. तसेच युवकांनी कार्यकर्ता म्हणून चांगले काम करावे, जनतेचे प्रश्न सोडवून त्यांच्यापर्यंत पक्षाचे विचार पोहचवावेत, केवळ पाच वर्षाचे समाजकारण व राजकारण डोळ्यासमोर न ठेवता पुढील २५ वर्षाचे काम डोळ्यापुढे ठेवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र व राज्यातील सरकारबाबत बोलताना, सरकारमुळे राज्यात स्थिरता निर्माण होणे आवश्यक होते मात्र सध्या कायदा व सुव्यवस्थेची घडी बिघडली असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शहरातच कायदा-सुव्यवस्था नसून गेल्या चोवीस तासात ३ खून झाल्याचे मुंडे यांनी यावेळी नमूद केले. महागाईच्या बाबत सरकारची दुट्टपी भूमिका असल्याची टीकादेखील त्यांनी केली. सरकार कडून ही परिस्थिती सुधारली नाही तर सरकारला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असे सूचक विधान त्यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना युवक प्रदेशाध्यक्ष  निरंजन डावखरे म्हणाले की,पक्षाने युवकांना दिलेल्या संधीचे सोने करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही राहून त्यांचा विश्वास संपादन करावा. शहरातील प्रत्येक वार्डात चांगले काम करून लोकांपर्यत पोहचावे. राज्यात सध्या असलेल्या असुरक्षिततेबाबत जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करून जनजागृती करावी. तसेच युवकांनी सज्ज होऊन नाशिक महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन डावखरे यांनी केले.

यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,राष्ट्रवादी मासिकाचे प्रमुख सुधीर भोंगळे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले,अर्जुन टिळे, आमदार जयवंतराव जाधव, नवनियुक्त शहराध्यक्ष रंजन ठाकरे,कार्याध्यक्ष छबू नागरे, प्रदेश पदाधिकारी मुक्तार शेख, सरचिणीस संजय खैरनार,युवक कार्याध्यक्ष वैभव देवरे, युवक प्रदेश सरचिणीस चेतन कासव, नगरसेवक हरिषभडांगे, समाधान जाधव, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष दिपक वाघ, युवती शहराध्यक्षप्रियंका शर्मा, सुरेखा निमसे, रोशनी पाटील आदींसह युवक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख