पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शंभर जागा जिंकेल - सुनील तटकरे

20 Sep 2016 , 06:15:54 PM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शंभर जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शतक ठोकेल, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांशी आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते माननीय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडचा कायापालट झाला आहे. या विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी नक्कीच शंभर जागा जिंकेल. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू असवानी, शिक्षण मंडळ सभापती निवृत्ती शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाता पलांडे, माजी महापौर मोहिनी लांडे यांच्यासह पक्षातील अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडची निवडणूक राज्यसरकारने प्रतिष्ठेची बनवली आहे. 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून त्यांनी सत्ता मिळवली पण 'अच्छे दिन'चा त्यांना विसर पडला हे आता मतदरांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल देतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.महापालिकेच्या निवडणुकीत मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. तसेच आघाडीबाबत निर्णय हा स्थानिक पाळीवरच घेण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तटकरे म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. या लोकांना चांगले कार्यकर्ते तयार करता आले नाहीत म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या निवडणुकीत तुम्हाला अनेक आमिषे दाखवली जातील. पण कोणत्याही आमिषाला बळी न पडता पालिकेत एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा. ज्यांनी पक्षात राहून अनेक पदे उपभोगली, आमदार झाले ते पक्षातून इतर पक्षात गेले. त्यामुळे जे पक्षाचे निष्ठावंत आहेत त्यांचा विचार करा, जे गेले त्यांचा विचार करु नका, असा टोला त्यांनी भाजप शहकाध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव न घेता लगावला.

निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप सातत्याने होत आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी प्रभाग रचना बदलली, परंतु प्रत्येकवेळी त्यांना सपाटून मार खावा लागला आहे. कशीही प्रभाग रचना केली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे. ज्यावेळी राजकारणातील सर्व डावपेच संपतात त्यावेळी अफवा पसरवण्याचे काम केले जाते. पण कोणी कितीही अफवा पसवल्या तरी त्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. परंतु त्याची चौकशी करण्याचे आदेश हे भाजप सरकार देत नाही. कारण शिवसेनेला डिवचण्याचे धाडस त्यांच्यामध्ये नाही. सभागृहात शिवसेना नेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे नुसते बघितले तरी हे नेते गप्प बसतात. बाहेर मात्र हीच शिवसेना वेगळ्या गृहमंत्र्यांची मागणी करते, असा चिमटा तटकरे यांनी काढला.

संबंधित लेख