ग्रामीण व शहर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक

20 Sep 2016 , 06:20:25 PM

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पूर्वतयारीसाठी पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण व शहर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत खासदार वंदना चव्हाण आमदार जयदेवराव गायकवाड,अनिल भोसले आणि इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी निवडणुकीत पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता यावी, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी सरकारच्या अकार्यक्षमतेवर निशाणा साधत, पालघर जिल्ह्यात वर्षभरात कुपोषणामुळे ६०० मुले दगावली, त्यामुळे हे सरकार काय काम करत आहे? असा खरमरीत प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोपर्डी बलात्कार, शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करत या राज्यात कोणीच सुरक्षित नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. हे सरकार फक्त आश्वासन देत आहे त्या आश्वासनांची पूर्तता मात्र होताना दिसत नाही असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.

दरम्यान, मराठा समाजाच्या मोर्चांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, मराठा समाजाचे मोर्चे हे कुठल्याही समाजाविरोधात नाही. हा दलित विरुद्ध मराठा असा संघर्ष नाही. मराठा समाज हा त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर आला आहे, दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेण्यासाठी नाही असे मत पवार यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख