सरकारचा बुरखा फाडणारे लक्षवेधी ‘राष्ट्रवादी’

20 Sep 2016 , 07:01:56 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील युती सरकारचा बुरखा फाडणारे लक्षवेधी मासिक ‘राष्ट्रवादी’ हे प्रसिद्ध झाले आहे. उरीला झालेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा काश्मिर प्रश्न उफाळून आला आहे. यानिमित्ताने काश्मिरमधील सत्यपिरिस्थितीचा आढावा या मासिकाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या मासिकाच्याद्वारे बलुचिस्तानच्या संवेदनशील प्रकरणावरही प्रकाश टाकण्यात आलेला आहे. राज्यातील असंवेदनशील सरकारच्या धोरणांवर टीकाटिप्पणी करतानाच शेतकरी प्रश्न,दलित विरोधी हिंसाचार तसेच देशातील वाढती सांप्रदायिकता या विषयांवरही मासिकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे.
या मासिकाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजप व त्यांच्यासोबत फरफटत जाणारी शिवसेना यांच्या शेतकरी विरोधी सरकारावर मार्मिक टिप्पणी केली आहे. गुजरातमध्ये दलित विरोधी हिंसाचाराला संपादकीयमधून राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांनी वाचा फोडली आहे. गुजरातमध्ये चार दलितांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली या वृत्ताचा वेध डॉ.आनंद तेलतुंबडे यांनी घेतला आहे. गायींची रक्षा नव्हे तर त्यांची काळजी घ्या हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारही या माध्यमातून पुरवण्यात आले आहेत. गुजरातमधील दंग्यांच्या सूत्रधारांचा ‘पर्दाफाश’ हे पुस्तक काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पुस्तकाचे परिक्षण, दंग्यामागची मानसिकता तसेच सत्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मासिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सरकारच्या ‘आम्ही सांगू ते धोरण आणि बांधू ते तोरण’ या नितीवर या लेखामध्ये सडकून टीका करण्यात आली आहे. या मासिकाच्या माध्यमातून शरद पवार यांनी देशातील वाढत्या सांप्रदायिकतेवर चिंता व्यक्त केली आहे. देशात कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने सांप्रदायिकता वाढते आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आज देशात खरे बोलणेही कठीण झाले आहे. राज्यात खरे बोलल्यास कलबुर्गी होण्याची धमकी मिळते. सध्या देशात आपण वैचारिक स्वातंत्र्य गमवत आहोत अशी टीका शरद यादव यांनी या  मासिकाच्या माध्यमातून केली आहे. बहुचर्चित वस्तू व सेवा कराचा उहोपांगही या मासिकाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यामाध्यमातून अर्थतज्ज्ञांच्या सेवा करावरील चर्चासत्राचा गोषवारा संचालक अभय टिळक यांनी वाचकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. 
तसेच माजी न्यायमूर्ती बी .एन देशमुख यांचा गौरवसोहळा औरंगाबाद येथे पार पडला.या कार्यक्रमाचे  चित्रणही या मासिकाद्वारे करण्यात आले आहे. देशमुख यांच्याकडून कशाप्रकारे सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यात आली याचा वेधही या लेखातून घेण्यात आला आहे. ‘कहाणी सहद्यी साध्वीची’ या लेखातून संत मदर टेरेसा यांच्या कार्याचा धावता आढावा घेण्यात आला आहे. या सर्व विषयांवरील माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवर वर क्लिक करा. 
 http://ncp.org.in/magazine/Sept_2016.pdf

संबंधित लेख