धुळ्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धनंजय मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर यश

22 Sep 2016 , 05:34:41 PM

धुळ्यातील अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीकरीता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर यश आले असून 30 सप्टेंबरला पाणी सोडण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मंगळवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांवर दाखल कलम 333 चे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशा मागण्या धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. तसेच 30 सप्टेंबरला पाणी न सोडल्यास 1 ऑक्टोबरपासून स्वत: धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशारा मुंडेंनी दिला आहे.
धुळे येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी अमानुषपणे लाठीमार केल्याने राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी आज तातडीने धुळ्यात जाऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन जखमी शेतकऱ्यांची विचारपूस केली. तसेच आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आणि जिल्हा पोलीस प्रमुख एस. चैतन्य यांची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसमवेत चर्चा घडवून आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला. कालव्यातून पाणी सोडणे, शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेणे आणि लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मुंडे यांनी लावून धरली. अखेर प्रशासनाने नमते घेत 30 सप्टेंबरला पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, श्री.राजवर्धन कदमबांडे, किरण शिंदे, किरण पाटील व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख