राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उस्मानाबाद कार्यकर्ता मेळावा

22 Sep 2016 , 05:37:13 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उस्मानाबाद कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, आ.राणाजगजीतसिंग पाटील, आ. राहुल मोटे, आ. विक्रम काळे, स्थानिक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन करताना सुनील तटकरे यांनी ही निवडणूक पक्षासाठी कसोटीची ठरणार असल्याचे प्रतिपादन केले. याआधी पक्षाकडे सत्ता असताना निवडणुका झाल्या होत्या, आता सत्ता नसताना आपल्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे आणि यश संपादीत करायचे आहे, असे तटकरे म्हणाले. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जातीयवादी सरकार राज्यात आणि देशात काम करत असल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी भाजप सरकारवर केली. देशातील जातीयवादी शक्तींना हरवायचे असेल तर आपल्याला शेतकरी तसेच सामान्य कार्यकर्त्यांना एकत्र आणावे लागेल, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
'अच्छे दिन'चा वादा करणाऱ्या सरकारला आता जनतेचा विसर पडला आहे, हे संपूर्ण देशासह राज्यानेही अनुभवले. केंद्रातील सरकारला अडीच तर राज्यातील सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहे तरी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झाली नाही, असा चिमटा त्यांनी राज्य सरकारला काढला. आघाडीचे सरकार असताना आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत तत्कालीन सरकारने केली होती. मात्र गेली ३ ते ४ वर्ष मराठवाडा दुष्काळाने ग्रासला असताना या सरकारने चारा छावण्या उभारण्यास फार वेळ लावला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती फार वाईट आहे, महिला सुरक्षित नाहीत, महिलांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. मात्र, नागरिकांचा आक्रोश दिसत असूनही सरकार त्यांची दखल घेत नसल्याची खंत तटकरे यांनी व्यक्त केली.
आरक्षणाबाबत बोलाताना मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे हीच राष्ट्रवादीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण अनेक बैठका झाल्या तरी धनगरांना आरक्षण मिळाले नाही आणि तेही फक्त आश्वासनच निघाले असे सांगत सरकार मराठा आरक्षणाबाबतही कोर्टात योग्य भूमिका मांडत नसून योग्य वकील नेमत नाही, असा आरोप तटकरे यांनी सरकारवर केला. शिवसेना सत्तेमध्ये असून विरोधी पक्षाची भूमिका घेते यात शिवसेनेचा दुटप्पीपणा दिसतो असे टीकास्त्र त्यांनी यावेळी शिवसेनेवर सोडले.

संबंधित लेख