युती सरकारला जनतेच्या दरबारात उघडे पाडा – सुनील तटकरे

23 Sep 2016 , 05:10:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले 'अच्छे दिन'चे स्वप्न कधीच साकार होणार नाही. सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून पहिलेच दिवस बरे होते, असे म्हणण्याची वेळ आता जनतेवर आली आहे. तेव्हा घराघरात जाऊन जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस करत असलेल्या कामाची माहिती द्या, पक्षसंघटन मजबूत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच यश मिळणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्यास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त खैरसागर, जीवन गोरे, आमदार अमरसिंह पंडित, सुरेश धस, प्रकाश सोळंके, बदामराव पंडित, पृथ्वीराज साठे, राजेंद्र जगताप,नंदकिशोर मुंदडा, उषाताई दराडे, हेमाताई पिंपळे, सय्यद सलीम, भारतभुषण क्षीरसागर, विजयसिंह पंडीत, अक्षय मुंदडा, संदिप क्षीरसागर, जयदत्त धस व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर जनमत तयार होऊ लागले आहे. अच्छे दिन म्हणत सरकारने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या दरबारात युती सरकारला उघडे पाडणार, असा इशारा त्यांनी दिला. बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकसंधपणे आणि मोठ्या उमेदीने कामाला लागावे, असे आवाहन तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

संबंधित लेख