पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘लक्ष्य २०१७’

26 Sep 2016 , 05:09:13 PM

पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कार्यकर्त्यांसाठी 'लक्ष्य २०१७' या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. शिबीराच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक विकासकामे केली असून नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. २०१७ हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून कामाला लागा, तसेच जनतेच्या मनात विश्वाजस निर्माण होईल असे काम करा, असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी सत्ताधारी भाजप सरकारला टीकेचे लक्ष्य करत, निवडणुका तोंडावर आल्यावर खोटी आश्वायसाने देऊन, स्वप्ने दाखवून नागरिकांची दिशाभूल करणे हे भारतीय जनता पक्षाचे तंत्र असल्याचे पवार यांनी सांगितले. भाजपच्या राज्यात कामगार, शेतकरी, गरीब कोणीच सुखी नाहीत. त्यांच्या जीवनाशी सरकारला काहीच देणेघेणे नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजप पक्ष आरएसएसचा अजेंडा पुढे नेत आहे. सर्वधर्म समभाव ही आपल्या देशाची ओळख आहे. सर्वधर्म समभाव हा एकता आणि अखंडतेचा कणा आहे. दुर्दैवाने हा कणा कमकुवत करण्याचे काम राज्यात आणि देशात सुरु आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. पण आपल्याला जनतेवर पूर्ण विश्वास असून सत्ताधाऱ्यांच्या या धोरणाला जनता नाकारेल आणि त्यांना सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
या शिबिरास पुणे शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण देखील उपस्थित होत्या. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हे कार्यकर्ता शिबीर चालणार असून कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती लाभत आहे.

संबंधित लेख